विठ्ठल ममताबादे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
उरण शहरात एन आय हायस्कूल जवळ राहणाऱ्या २० वर्षीय यशश्री शिंदे हत्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांना अखेर मोठे यश मिळाले आहे. यशश्रीच्या हत्येचा आरोप असलेला दाऊद शेख हा घटनेच्या दिवसापासून फरार होता. त्याचा मोबाइलही बंद होता. महाराष्ट्रात आणि राज्याबाहेरही पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर दाऊद शेखच्या पोलिसांनी राज्याबाहेर जाऊन मुसक्या आवळल्या.या हत्येच्या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे.
उरण येथील यशश्री शिंदे या २० वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह निर्जनस्थळी फेकण्यात आला होता. या प्रकरणी यशश्री शिंदेच्या आईवडिलांनी दाऊद शेख याच्यावर आरोप केलेले आहेत.
यशश्री शिंदेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यात ती दाऊद शेख सोबत बोलत होती, हे समोर आले. त्यानंतर दाऊद शेखच्या नंबरवर पोलिसांनी कॉल केले, पण त्याचा नंबर बंद होता. महत्त्वाची बाब म्हणजे यशश्री शिंदे आणि दाऊद शेख या दोघांचे मोबाईल एकाच वेळी बंद झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते.
दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा असल्याची माहिती पोलिसांना तपासातून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी एक पथक कर्नाटकात पाठवले होते. कर्नाटकातील गुलबर्गा येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
आणखी एका व्यक्तीला चौकशीसाठी घेतले ताब्यात.
उरणमधील यशश्री शिंदेची निघृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमानं यशश्रीला अक्षरशः हालहाल करुन ठार मारल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोहसिन नावाच्या तरुणाला कर्नाटकातून ताब्यात घेतलं आहे. मोहसिनला पुढील चौकशीकरता महाराष्ट्रात आणलं जाणार आहे. यशश्री बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगानं हलवली. त्यावेळी यशश्रीच्या कॉल रेकॉर्ड्सवरुन एका नंबरवर तिचं सातत्यानं बोलणं होत असल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी तपासाची दिशा त्यानुसार वळवली आणि तो नंबर ज्याच्या नावावर होता, त्याचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांच्या हाती यश आलं असून पोलिसांनी तो नंबर ज्या व्यक्तीचा होता, त्याला बेड्या ठोकल्या आहेत.आता पोलीस तपासातून नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरेल.
आरोपीला ताब्यात घेण्यात आले
यशश्री शिंदे हत्त्या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीचे नाव दाऊद शेख असून लवकरच त्याला महाराष्ट्रात आणले जाणार आहे. सध्या आरोपी कर्नाटक मध्येच आहे. महाराष्ट्रात आणल्या नंतर सर्व तपास करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कोर्टात हजर केले जाणार आहे.
डॉ. विशाल नेहूल. सहाय्यक पोलीस आयुक्त न्हावा शेवा बंदर विभाग.