नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड एम.आय.डी. सी. पोलिसांनी अंबड औद्योगीक वसाहतीत एकाच बँकेत वर्षभरात दोनदा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोराला गजाआड केले आहे. अटकेनंतर दरोडेखोराची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर अंबड पोलीस ठाणे हद्दीत इंडियन बँकेत चोरी, कंपनीत चोरी तसेच मोटार सायकल चोरीचे असे एकूण सात गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दरोडेखोराकडून पोलिसांनी १,५९,२२३ रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंबड औद्योगिक वसाहतीतील इंडियन बँकेत दोनदा स्लॅप फोडून स्ट्रॉंग रूम मध्ये प्रवेश करीत लॉकर फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला होता. मात्र सायरन वाजल्याने त्या संशयिताने येथून पळ काढला होता. याबाबत अंबड एम.आय.डी. सी. पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
असे घेतले ताब्यात
पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप शेवाळे,अतुल पाटील व गुन्हेशोध पथकाने तांत्रीक व मानवी संसाधनाचा कौशल्यपुर्ण वापर करुन घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेजचा अभ्यास करुन खात्रीशीर गोपनीय माहिती प्राप्त करुन त्या आधारे अंबडगाव येथील मनपा शाळेसमोरुन संशयित अमितकुमार शिवशंकर प्रसाद, ( २२ वर्षे,अंबडगाव) मुळगाव लक्ष्मीपुर, ता. जि. सिवान, राज्य बिहार, यास ताब्यात घेऊन सदर गुन्हयात अटक केली.
यांनी केली कामगिरी
सदरची कामगिरी प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील,संदिप शेवाळे, अविनाश चव्हाण, पोलीस अंमलदार जनार्दन ढाकणे, जितेश शिंदे, विश्वास सांळुखे, संदिप खैरनार, आवेज शेख, किरण सोनवणे, श्रीहरी बिराजदार, श्रीकांत सुर्यवंशी, महेश सावंत, हेमंत आहेर, दिपाली खर्डे, विजय सोनवणे, अर्जुन कांदळकर, राहुल सोनवणे यांनी पार पाडली.