नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील पिंपळगाव बहुला येथील पोस्ट कार्यालयात २९ लाख रूपयांचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डाकपाल विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अंबड व सिडको कार्यालयातील फसवणुक प्रकरण समोर आले होते. त्यापाठोपाठ पिंपळगाव बहुला येथेही हा प्रकार घडल्याने पोस्टातील कारभार चव्हाट्यावर आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश भगवान तिवडे (रा.पिंपळगाव बहुला) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित डाकपालाचे नाव आहे. याबाबत पोस्टाचे अधिकारी मनिष राजाराम देवरे यांनी फिर्याद दिली आहे. तिवडे २०१९ पासून पिंपळगाव बहुला येथील डाकघरचा कार्यभार सांभाळत असून पदाचा दुरूपयोग करीत त्यांनी ऑगष्ट २०२३ पर्यत २९ लाख १० हजार २०० रूपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अंबड आणि सिडको कार्यालयात डाक सहाय्यक पदावर कार्यरत र्बोरकर नामक कर्मचा-याने दहा लाखाची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला होता. अधिक तपास उपनिरीक्षक नळकांडे करीत आहेत.