इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अकोल्यात अमोल मिटकरी यांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सुपारीबाज अशी टीका त्यांनी केल्यानंतर मनसेचे कार्यकर्त्ते संतापले होते. त्यामुळे त्यांनी ही तोडफोड केली.
पुण्यात पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी राज ठाकरे आले होते. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धरणाबाबतच्या जुन्या वक्तव्यावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केला होता.
आज मिटकरी अकोल्यात विश्रामगृहात आले होते. ते आतमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. ते आले तेव्हा विश्रामगृहाबाहेर मनसेचे कार्यकर्तेदेखील होते. अमोल मिटकरी विश्रामगृहात असताना बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर मिटकरी म्हणाले की, मी कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही. गाडीच्या तोडफोड प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. या आरोप – प्रत्यारोपानंतर आता अजित पवार गट काय उत्तर देते हे महत्त्वाचे आहे.