नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिन्नर औद्योगीक वसाहतीतील एका कारखान्यात नोकरीस असलेल्या कर्मचा-यास बँकेच्या नावे आलेली कर्जाची लिंक उघडणे चांगलेच महागात पडले आहे. जमा झालेली कर्जाची रक्कम अल्पावधीत सायबर भामट्यांनी लांबविली असून यामुळे या कर्मचा-यास डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. बँकेनेही वरती हात केल्याने अखेर नोकरदाराने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलींद वसंत कुलकर्णी (रा.पाथर्डी फाटा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कुलकर्णी सिन्नर औद्योगीक वसाहतीतील एका कारखान्यात नोकरीस असून गेल्या १६ जून रोजी रात्री आपला मोबाईल हाताळत असतांना ही घटना घडली. पगारी खाते असलेल्या बँकेच्या कस्टमर केअरने त्यांना तात्काळ कर्ज मिळण्याबाबतची लिंक पाठविल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
ही लिंक उघडताच त्यांच्या बँक खात्यात ५ लाख ७० हजार रूपये जमा झाल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यानंतर कुलकर्णी झोपी गेले असता अल्पावधीत त्यांच्या बँक खात्यात कर्जरूपी जमा झालेली रक्कम सायबर भामट्यांनी लांबविली. सकाळी उठल्यानंतर दोन वेळा खात्यातून १ लाख ५१ हजार ८०४ रूपये परस्पर लांबविण्यात आल्याचा प्रकार समोर आला. कुलकर्णी यांनी बँकेत धाव घेतली असता तुम्ही कर्ज घेतले आहे ते फेडा असे म्हणत बँक कर्मचा-यांनी हात वर केल्याने अखेर कुलकर्णी यांनी पोलीस ठाण्याची पायरी चढली असून अधिक तपास उपनिरीक्षक फुंदे करीत आहेत.