इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इस्रायली लष्कराने गाझा पट्टीत जमिनीवर हल्ले सुरू केले आहेत; मात्र इस्रायली सैन्य लवकरच हमासचा खात्मा करेल आणि पश्चिम आशियात सुरू असलेली लढाई संपुष्टात येईल, असे नाही. हमासशी संबंधित दोन सूत्रांनी दावा केला आहे, की हमासमध्ये इस्रायलला दीर्घकाळ रोखून ठेवण्याची पुरेशी ताकद आहे आणि या काळात आंतरराष्ट्रीय दबावामुळे इस्रायलला युद्धविराम मान्य करण्यास भाग पाडले जाईल.
युद्धबंदीच्या अटी आणि इस्रायली ओलीसांच्या सुटकेच्या बदल्यात ते अनेक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करू शकतात, असा हमासला विश्वास वाटतो. हमास इस्रायलला अडकवण्याच्या तयारीत आहे. हमासने शस्त्रे, क्षेपणास्त्रे, अन्न आणि औषधांचा मोठा साठा जमा केला आहे. हमासकडे सुमारे ४० हजार लढवय्ये आहेत आणि गाझा पट्टीत पसरलेल्या बोगद्यांच्या जाळ्याच्या मदतीने ते इस्रायलला अनेक महिने या युद्धात अडकवून ठेवू शकतात, असे पॅलेस्टिनी संघटनेला वाटते. दाट लोकवस्तीच्या गाझा पट्टी भागात इस्रायली सैन्याविरुद्ध गनिमी युद्ध लढण्याची हमासची योजना आहे, जेणेकरून इस्रायली सैन्याचा पराभव करता येईल. कतारच्या मध्यस्थीतून हमासने अप्रत्यक्षपणे अमेरिका आणि इस्रायलला संदेश दिला आहे, की इस्रायली ओलीसांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायली तुरुंगात बंदिस्त पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका हवी आहे. इतकेच नाही तर युद्धबंदीच्या अटींनुसार इस्रायलचा विस्तार थांबवण्याचा आणि गाझा पट्टीवर इस्रायलची सुरू असलेली नाकेबंदीही संपवण्याची हमासची योजना आहे. त्याचवेळी इस्रायलवर युद्धबंदीसाठी दबाव वाढत असून जगभरातून इस्रायलच्या कृतीचा निषेध सुरू झाला आहे.
संयुक्त राष्ट्रानेही गाझा पट्टीमध्ये युद्धविराम करण्याचे आवाहन केले होते. त्याचवेळी इस्रायल थांबायला तयार नाही आणि इस्रायलच्या पंतप्रधानांनी आपण सध्या युद्धविरामाचा विचार करत नसून हमासचा नायनाट करणे हेच त्यांचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. जॉर्डनचे माजी परराष्ट्र मंत्री आणि सध्या अमेरिकेच्या ‘कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस’ संस्थेसाठी काम करत असलेले मारवान अल मूशर म्हणतात, की हमासला संपवणे सोपे नाही. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध लवकर संपणार नाही. इस्रायलचे संयुक्त राष्ट्रातील माजी राजदूत डॅनी डेनॉन म्हणतात, की हा लढा दीर्घ आणि वेदनादायी असेल हे आम्ही मान्य केले आहे. शेवटी आमचाच विजय होईल आणि हमासचा नायनाट होईल, असे ते म्हणाले असले तरी यासाठी किती किंमत मोजावी लागेल, हे ध्यानात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.