मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वरळीत पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरणाची पुनरावृत्ती असून बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ठाण्यातील व्यावसायिकाच्या कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला असून विनोद लाड असे मृत तरुणाचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वीच वरळीत अशाच झालेल्या अपघातात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर चालक फरार झाला होता. या प्रकरणी संताप व्यक्त होत असताना पुन्हा एकदा अशीच घटना वरळीत घडली. वरळी सीफेस येथील ए.जी. खान अब्दुल गफारखान रोडवर २० जुलै रोजी बीएमब्यल्यू कारची विनोदच्या दुचाकीला धडक बसली. विनोद खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. विनोदवर नायरच्या अतिदक्षता रुग्णालयात उपचार सुरू होते. आठ दिवस सुरू असलेली विनोदची मृत्यूशी झुंज शनिवारी संपली.
विनोदचा अपघात झाला, ती कार ठाण्यातील अत्तर व्यावसायिकाची आहे. वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये या व्यावसायिकाचा कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यासाठी ते वरळीमध्ये आले होते. अपघात घडला, त्या वेळी व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर कार चालवत होता. विनोद हा मूळचा मालवण येथील होता. ठाण्यात ट्रान्सपोर्ट कंपनीत तो पर्यवेक्षक पदावर कामाला होता. तो हिल रोड येथे त्याच्या चुलत बहिणीकडे राहत होता. ज्या ठिकाणी कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला, तिथून अवघ्या शंभर मीटर अंतरावर हा अपघात झाला.