नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदावरी नदीत वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी ब्रह्मगिरीपासून गिरणारे, नाशिकपर्यंत ज्या ज्या ठिकाणी नदीत थेट सांडपाणी मिसळले जात असेल अशी ठिकाणे ओळखून, शोधून त्याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश विभागीय महसूल आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. यासाठी नाशिक महानगरपालिकेने नोडल अधिकारी नेमावा, असे निर्देश या बैठकीत डॉ.गेडाम यांनी दिले आहेत.
गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, उपायुक्त (करमणुक शुल्क) राणी ताटे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, याचिकाकर्ते निशीकांत पगारे, राजेश पंडीत आदी उपस्थित होते. या बैठकीस निरीचे प्रतिनिधी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.
गोदावरीत होणारे प्रदूषण रोखण्यासाठी नदीत मिसळणारे मलजल कसे रोखता येईल, त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, यावर आज दिनांक २९ जुलै रोजी पार पडलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
विभागीय आयुक्त श्री. गेडाम पुढे म्हणाले, गोदावरी नदीत मिसळणारे मलजल हेच गोदावरी नदीचे प्रदूषण वाढण्याचे प्रमुख कारण आहे. मलजल जर गोदावरीत मिसळले नाही, तर नदीचे प्रदूषण आपोआप कमी होणार आहे. ज्या-ज्या ठिकाणी नदीत मलजल मिसळले जाते, अशी ठिकाणी ओळखून त्यावर त्वरित उपाययोजना कराव्यात. तसेच मलजल किती तयार होते आणि त्यापैकी किती मलजल हे मलजल शुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचते, त्यानंतर पोहोचलेल्या मलजलावर योग्य ती प्रक्रिया होते की नाही यावरही लक्ष केंद्रित करायला हवे, जेणेकरून मलजल नदीत मिसळणार नाही यासाठीच्या उपाययोजनांवर भर द्यावा असेही श्री गेडाम यांनी आजच्या बैठकीत सांगितले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मधील कंपन्यांचेही रासायनिक पदार्थ मिश्रित पाणी गोदावरी नदीत मिसळले जाते, असा नाशिक महानगरपालिकेचा आक्षेप आहे. याबाबत निरी कडे सविस्तर चर्चा करून त्याबाबतही अभ्यास करून अहवाल सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आजच्या बैठकीत दिले.
याशिवाय गोदावरीतील पाण्याची पातळी ही पाऊस किंवा धरणातून पाणी सोडताना कशी बदलू शकते, याबद्दलची स्वयंचलित यंत्रणा तयार करण्याचे निर्देशही डॉ. गेडाम यांनी दिले. त्याकरिता सक्षम तांत्रिक यंत्रणा जसे की भारत सरकार यांचे BISAG एन यासारख्या संस्थांची मदत घेण्याच्या त्यांनी सूचना केल्या.अशी यंत्रणा अस्तित्वात आल्यास प्रत्यक्ष पूर्व परिस्थिती उद्भवण्याच्या आधी त्याबाबतचा सतर्कता संदेश संबंधित यंत्रणा आणि नागरिकांना मिळू शकतो त्या दृष्टीने प्रयत्न करा असेही डॉ. गेडाम यांनी आजच्या बैठकीत सुचविले.