नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महामार्गावरील लेखानगर भागात उड्डाणपूलावरून उतरत असतांना टायर फुटल्याने कारचालक ठार झाला. कार इलेक्ट्रीक पोलवर जावून आदळल्याने चालक गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिवम राजेश ओतारी (२६ रा.सप्तशृंगी चौक लेखानगर) असे मृत चालकाचे नाव आहे. ओतारी गेल्या रविवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास मुंबईकडून नाशिकच्या दिशेने कारमधून प्रवास करीत होता. लेखानगर येथे उड्डाणपूलावरून खाली उतरत असतांना हा अपघात झाला. भरधाव कारचे टायर फुटल्याने कार नजीकच्या इलेक्ट्रीक पोलवर जावून आदळली होती.
या अपघातात ओतारी गंभीर जखमी झाला होता. डोक्यास व कमरेस गंभीर दुखापत झाल्याने त्यास सुविधा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात येवून अधिक उपचारार्थ सह्याद्री हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरू असतांना डॅा. अमरीश देशपांडे यांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत आदवेत वझरे यांनी खबर दिल्याने पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार आवारे करीत आहेत.