इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काहींनी त्यांना विरोध केला होता. त्यांचा राज्याभिषेक करायचा होता, तेव्हा समाजातील एका विशिष्ट घटकातील लोकांनी विरोध केल्याने उत्तरेकडून कोणालातरी आणावे लागले. त्या कालखंडात ऐक्याला धक्का देणारा एक वर्ग होता. दुर्दैवाने हा वर्ग आजही आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ऐक्य परिषदेत बोलत असताना त्यांनी मणिपूर आणि इतर राज्यांतील दंगलीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले. पवार म्हणाले, की मणिपूरमध्ये अनेकांची घरे जळत आहे. शेती उद्ध्वस्त होत आहे. स्रियांवर अत्याचार सुरू आहेत, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या राज्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. पंतप्रधानांना त्या ठिकाणी भेट द्यावी वाटली नाही. एखाद्या राज्यावर एवढे मोठं संकट आल्यानंतर राज्यकर्त्यांनी त्याला सामोरे जावे, तेथील लोकांना विश्वास द्यावा, त्यांच्यात एकवाक्यता निर्माण करावी, कायदा-सुव्यवस्था जतन करावी, ही त्यांची जबाबदारी असते;परंतु मोदी यांनी यापैकी काहीही केले नाही.
महाराष्ट्रात आणि देशातील परिस्थितीत बदल करण्यासाठी सर्व जात-धर्म, भाषा यामध्ये जे अंतर आहे, ते दूर करण्याची गरज आहे. एकसंध समजा आणि एकसंध राष्ट्र ही संकल्पना घेऊन एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. ते करण्यासाठी ही ऐक्य परिषद मोलाची कामगिरी बजावेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची चर्चा झाली. मणिपूरचे विविध जाती, भाषा बोलणारे लोक दिल्लीला आले होते. पिढ्यानपिढ्या एकत्र असलेला लहानसा प्रांत अस्वस्थ झाला, दोन जमातींमध्ये संघर्ष झाला. घरेदारे पेटवण्यात आली. शेती उद्ध्वस्त करण्यात आली. स्त्रियांवर अत्याचार झाले. पिढ्यानपिढ्या एकत्र राहणारा, सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही, असे सांगून महाराष्ट्रातही मणिपूरसारखे काहीतरी घडण्याची चिंता वाटते, असे पवार म्हणाले.
ते म्हणाले, की मणिपूरमध्ये जे घडले, तेच आजूबाजूच्या राज्यात घडले. कर्नाटकात घडले. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही काही घडले की काय, अशी चिंता आहे. सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊ गेले. त्यांनी समाजाचा विचार केला. देशात अनेक राजे होऊन गेल्याचे ऐकायला मिळेल; पण साडेतीनशे वर्ष झाल्यानंतरही आजही आदर आणि अभिमान असणारा राजा कोण, असा प्रश्न कोणालाही विचारल्यावर एकच नाव येते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे. त्यांनी लोकांसाठी राज्य केले. दिल्ली मुगलांची होती, देवगिरी यादवांची होती, राजपूतांचे राज्य होते; पण शिवाजी महाराजांचे राज्य हे भोसल्यांचे नव्हे, तर हिंदवी स्वराज्य आणि रयतेचे राज्य म्हणून ओळखले गेले. हे सूत्र शिवछत्रपतींनी आपल्याला दिले, असे पवार यांनी सांगितले.