नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या कुसुमाग्रज अभ्यासवृत्ती साठी नाशिक येथील भावेश ब्राहणकर यांची निवड झाली आहे. सर्जनशील साहित्य निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरणारी एक लाख रुपये मूल्याची ही अभ्यासवृत्ती वर्षातून एकदा दिली जाते.
मुरलीधर खैरनार, अवधूत डोंगरे, प्रणव सखदेव, गजानन तायडे, पंकज भोसले, अविनाश कोल्हे, हिना कौसर खान या अभ्यासवृत्तीचे यापूर्वीचे मानकरी होते. हे सर्वजण आजचे मराठीतील आघाडीचे लेखक म्हणून ओळखले जातात.
भारत आणि चीन यांच्या सीमेवरील अरुणाचल या भारतीय राज्यातील सर्वसामान्य जनतेला विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. तिथे तैनात असलेल्या लष्कराचे कामही खूप अवघड असते. या प्रदेशात प्रत्यक्ष राहून तिथल्या अनुभवावर आधारित सर्जनशील लेखन करण्याचा ब्राह्मणकर यांचा मनोदय आहे. कुसुमाग्रज अभ्यासवृत्ती प्राप्त झाल्याबद्दल ब्राह्मणकर यांचे प्रतिष्ठानचे कार्यकारी मंडळ सल्लागार आणि अभ्यास वृत्ती समिती प्रमुख प्राध्यापक हर्षवर्धन कडेपूरकर यांनी अभिनंदन केले आहे