इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी मुंबईः बंदुकीचा धाक दाखवून खारघर येथील एका सराफा दुकानात मोठा दरोडा टाकून लाखोंचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटन घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तिघांनी बी. एम. ज्वेलर्स येथे हा दरोडा टाकला.
या दरोड्यात सराफा दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने दरोडेखोरांनी लंपास केले आहेत. दरोडेखोरांकडे पिस्तूल होते. घारघर येथील सेक्टर ३० मध्ये बी एम ज्वलर्स नावाचे हे दुकान आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून दरोडेखोर दरोड्याचे नियोजन करत असावेत, असा अंदाज आहे. इतरांना चेहरा दिसू नये तसेच सीसीटीव्हीत चेहरा कैद होऊ नये म्हणून त्यांनी हेल्मेट घातले होते. हेल्मेटसह ते सराफा दुकानात घुसले. विशेष म्हणजे लूटमार केल्यानंतर त्यांनी हवेत गोळीबार केला.
दरम्यान, या घटनेनंतर खारघर या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या भागात असणाऱ्या सराफा व्यापाऱ्यांत सध्या भीती आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चालू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.