इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अकोला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याभोवती प्रा. श्याम मानव, मनोज जरांगे आणि अनिल देशमुख यांच्यासारखे लोक सोडले आहेत, असा आरोप खा.अनिल बोंडे यांनी केला आहे. फडणवीस हे ब्राह्मण असल्याने त्यांच्या माध्यमातून बहुजन समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे हे कट कारस्थान सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
प्रसार माध्यमांशी बोलताना खा. बोंडे यांनी पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. मनोज जरांगे फडवणीस यांना शिव्या देतात. वाट्टेल ते बोलतात. भाजपमध्ये संस्कार असल्याने अन्य नेते बोलत नसतील; परंतु आमच्यासारखे लोक बोलायला आहेत. ज्या व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी सातत्यानेन काम केले, त्यांनाच शिव्या घातल्या जातात, याचे वाईट वाटत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पवार यांच्यामुळे मराठवाडा आणि विदर्भावर अन्याय झाला. साखर कारखान्यांसाठी ते बोलतात; मात्र विदर्भातल्या कापसावर बोलतात का, असा सवाल खा. बोंडे यांनी केला. पवार खूप हुशार आहेत. ते जरांगे, मानव, देशमुख यांच्यासारखी माणसे राज्यभर पेरतात. मानव आणि देशमुख यांना आता जाग आली आहे. त्यांना फडणवीस आता आठवले आहेत. हे सर्व ठरवून होत आहे. या सर्व संहिता बारामतीत लिहिल्या जात आहेत. त्या पवार यांच्या डोक्यातून निघतात, असे त्यांनी म्हटले.
सुरुवातीला जरांगे फडणवीस यांना खालच्या पातळीवर शिव्या देतात. नंतर मानव आरोप करतात. आता देशमुख आले. फडणवीस यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम सुरू आहे, असा आरोप खा. बोंडे यांनी केला. फडणवीस ताकदवान असून पवार यांना तेच टक्कर देऊ शकत असल्याने त्यांचे खच्चीकरण करण्याचे षडयंत्र सुरू असल्याची टीका खा. बोंडे यांनी केली.