इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः वादग्रस्त प्रशिक्षणार्थीन सनदी अधिकारी डॉ. पूजा खेडकरचे अनेक कारनामे बाहेर आले असताना तिच्या कुटुंबीयांचेदेखील अनेक कारनामे समोर येत आहेत. पूजा खेडकरच्या कुटुंबीयांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उघडकीस आणले होते. आता त्या सात-बारावरील नावात दुरुस्ती करण्यात आली आहे.
दिलीप धोंडिबा खेडकर ऐवजी आता दिलीप कोंडिबा खेडकर असा बदल करण्यात आला आहे. दिलीप यांनी १४ वर्षांपूर्वी १४ गुंठे जमीन बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे खरेदी केली आहे. ही जमीन विक्री करायची असल्याने त्या ठिकाणी खेडकर कुटुंबीयांनी तसा फलक लावला आहे. या जमिनीची किंमत दीड कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक आठमध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर जमीन आहे; पण आता सात-बारावर स्पेलिंग दुरुस्ती करण्यात आली आहे. दिलीप धोंडिबा खेडकरऐवजी दिलीप कोंडिबा खेडकर असा बदल करण्यात आला आहे.
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या खेडकर कुटुंबातील सदस्यांवर चौकशांचा ससेमिरा लागला आहे. बेनामी संपत्ती प्रकरणी प्राप्तिकर विभाग चौकशी करीत असताना सात-बारा उताऱ्यावरची नोंदच बदलण्यात आल्याने दिलीप कोंडिबा खेडकर? आणि दिलीप धोंडीबा खेडकर कोण? एकच व्यक्ती आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.