इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय महिला नेमबाज मनु भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक जिंकलं आहे. तीने भारताला कांस्यपदक जिंकवून दिल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी मनु भाकरही पहिला भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. गेल्यावेळेस तिच्या पिस्तुलमध्ये बिघाड झाल्याने पदक जिंकता आले नव्हते. मात्र यावेळी तीने भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे.
असा आहे मनू भाकर हिचा प्रवास
मनू भाकर ही नेमबाजीत कौशल्य आजमावणारी एक भारतीय ऑलिम्पिकपटू आहे. मुष्टियोद्धे आणि कुस्तीपटूंसाठी प्रसिद्ध असलेल्या हरयाणामधील झज्जर येथे जन्मलेली मनू भाकर, शाळेत टेनिस, स्केटिंग आणि मुष्टियुद्ध सारखे क्रीडा प्रकार खेळत असे. तिने ‘थांग टा’ नावाच्या मार्शल आर्ट्सच्या प्रकारातही भाग घेत, राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली. 2016 चे रिओ ऑलिम्पिक संपल्यानंतर, फक्त 14 वर्षांची असताना तिने नेमबाजीत कौशल्य आजमावण्याचा मनस्वी निर्णय घेतला आणि तिला ते आवडले, आपल्या निर्णयावर ती ठाम राहिली.
2017 च्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत, मनू भाकरने ऑलिम्पिकपटू आणि माजी जागतिक अव्वल स्थानावरील हिना सिद्धूला चकित केले. या स्पर्धेत तिने 9 सुवर्ण पदके जिंकली. मनूने 242.3 असे विक्रमी गुण मिळवत सिद्धूच्या आशा संपुष्टात आणत 10 मीटर एअर पिस्तुल प्रकाराची अंतिम फेरी जिंकली आणि सुवर्ण पदक जिंकले. नेमबाज म्हणून मनू भाकरला 2018 हे वर्ष यशदायक ठरले, कारण वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती नेमबाजीतील किशोरवयीन आकर्षण ठरली.
मेक्सिकोत ग्वाडालजारा येथे 2018 साली आयोजित आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या (इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन ISSF वर्ल्ड कप) विश्वचषकात, मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारामध्ये, मेक्सिकोच्या दोन वेळा अजिंक्यवीर ठरलेल्या, अलेजांड्रा झवालाचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले.
मनू भाकरने 2019 म्युनिक ISSF विश्वचषक स्पर्धेत चौथ्या स्थानासह ऑलिम्पिक पात्रतेवरही शिक्कामोर्तब केले. तथापि, तिचे टोकियो ऑलिंपिक 2020 मधील पदार्पण अपेक्षेनुसार झाले नाही. टोकियो 2020 नंतर लगेचच, लिमा इथे झालेल्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत, मनू भाकर महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात अजिंक्यवीर ठरली आणि 2022 च्या कैरो जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारामध्ये रौप्य, तर 2023 च्या हांगझू येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याच प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
प्रशिक्षण तळ: डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंज (नेमबाजी केंद्र), नवी दिल्ली
जन्मस्थान: झज्जर, हरयाणा