इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव- कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गेल्या २६ दिवसांपासून उपोषणाला बसलेले जगन्नाथ बावीस्कर आणि त्यांच्या सहकार्यांच्या आंदोलनाची आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सांगता झाली. पालकमंत्र्यांच्या हस्ते श्री.बावीस्कर यांना उसाचा रस पाजत उपोषण सोडविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयास समोर सुरू असलेल्या उपोषणाच्या सांगते वेळी आमदार चंद्रकांत पाटील, आमदार रमेश पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच मोठ्या संख्येने कोळी समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, कोळी समाजाच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन बैठका आयोजित करण्यात आल्या. कोळी समाजाच्या जातीच्या तसेच इतर विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. अधिसंख्यपदांचा सर्वात मोठा विषय मुख्यमंत्र्यांनी सोडविला आहे. असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, आज जवळपास दीडशे जात प्रमाणपत्र तयार झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी यांच्यासोबत बैठक लावली. यांची फलनिष्पत्ती म्हणून कोळी समाज बांधवांना ‘सी फॉर्म’ मध्ये प्रमाणपत्र वाटप होण्यास सुरुवात झाली आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे जळगाव मध्ये आठवड्यातून दोन दिवस काम चालणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. आदिवासी व्यक्तींना जातीचे दाखले देतांना येणाऱ्या रोजच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. वेळोवेळी आपणास जात प्रमाणपत्राबाबत अडचणी आल्यास आम्ही आपल्यासाठी फोनवर चोवीस तास उपलब्ध आहोत. कोळी सामाजाच्या जातीच्या दाखल्यांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. अशी ग्वाही ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार रमेश पाटील, उपोषणकर्ते जगन्नाथ बावीस्कर यांनीही आपले मत व्यक्त केले.