पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –पुणे शहरात पूर परिस्थितीमुळे अनेक भागात झालेला कचरा आणि चिखल स्वच्छता करण्यासाठी तसेच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे युद्धपातळीवर मोहिम हाती घेण्यात आली असून पूरबाधित परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे. महानगरपालिकेतर्फे शहरात रोगराई पसरू नये यासाठीदेखील उपायोजना करण्यात येत आहे.
शहरात २५ जुलै रोजी पहाटे मुसळधार पाऊस झाल्याने पुणे महानगरपालिका क्षेत्रातील खालील सखल भागातील साईनाथ नगर, वडगाव शेरी, शांतीनगर, इंदिरानगर, चिमागार्डन, योजना पोल्ट्री फार्म, विश्रांत सोसायटी, यशवंतनगरी, कळस, ताडीवाला रोड, पाटील इस्टेट, पुलाची वाडी, भीम नगर विसर्जन गणपती घाट, बालेवाडी, आदर्श नगर बोपोडी, कोथरूड बावधन प्रभाग क्र. १०, ११, १२, एरंडवणा, शाहू वसाहत, तपोधाम, राजपूत झोपडपट्टी स्मशानभूमी, शिवणे, उत्तमनगर माशे आळी, बाजारसमिती, इंदिरा वसाहत, भीमनगर, कोंढवे धावडे, एकता नगर, निंबज नगर, सहकारनगर, धनकवडी, कात्रज, आंबेगाव बुद्रुक, जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, नदीपात्र, अष्टभुजा, आपटे घाट, टिळक पूल, ओंकारेश्वर मंदिर आतील व बाहेरील परिसर या भागात पाणी शिरले होते.
महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालिन परिस्थिती विचारात घेऊन प्रथमतः बचाव कार्याला प्राधान्य देण्यात आले. यासाठी पुणे महानगरपालिकेकडील ८ बोटी तैनात करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून एनडीआरएफच्या दोन तुकड्या (प्रत्येकी ३० जवान व ४ बोटी) व सैन्य दलाचा एक कॉलम (८० जवान, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, २बोटी) असे तीन बचाव पथकही तैनात करण्यात आले.
स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात २६ ठिकाणी तात्पुरती निवारा व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणी पुणे महानगरपालिका, विविध सामाजिक संस्था, मंडळे व व्यक्ती यांच्या माध्यमातून जेवण, नाष्टा इत्यादीची सोय करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून ६८ पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याठिकाणी वैद्यकीय मदतदेखील आवश्यकतेनुसार उपलब्ध करण्यात आली. पुणे महानगरपालिकेमार्फत २ हजार ७०० ब्लँकेट, ५ हजार चादर आणि ७ हजार बेडशीट तसेच प्लास्टिक बादल्या पूरग्रस्तांना उपलब्ध करून देण्यात आल्या.
मदत व बचाव कार्यामध्ये स्वयंसेवी संस्था, विविध सेवाभावी व्यक्ती, मंडळे व त्यांचे कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचादेखील सहभाग होता. त्यांच्याकडून ७९१ स्वयंसेवक, १६ डॉक्टर, १८ हजार ५० अन्नाची पाकीटे, औषधे, २ हजार चादर, २ हजार ७०० ब्लँकेट, ८ हजार ५९८ पाणी बाटल्या आणि एक हजार स्वच्छता कीट उपलब्ध झाले.
बाधित परिसरात मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. यासाठी बाधित परिसरातील लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, महानगरपालिकेचे विविध विभागाचे अधिकारी व क्षेत्रिय अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. लोकप्रतिनिधींच्या सूचना, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांची मागणी इत्यादी बाबी विचारात घेऊन मदत कार्याचे नियोजन करण्यात आले आहे. पूर ओसरताच स्वच्छतेच्या कामास प्राधान्य देण्यात आले. २७ जुलै रोजी रोजी पुणे मनपामार्फत पूरबाधित परिसरात १२ मुख्य आरोग्य निरीक्षक, ६४ स्वच्छता निरीक्षक, ९८ स्वच्छता पर्यवेक्षक, ४ हजार २२७ स्वच्छता कर्मचारी, ७३ फवारणी कर्मचारी नेमण्यात आले होते.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार पूरबाधित भागाची युद्धपातळीवर स्वच्छता करण्यात आली. परिसरात रोगराई पसरू नये याचीदेखील दक्षता घेण्यात येत आहे. ९९८ किलो जंतुनाशक पावडर, १०४ स्पेर पंप, ४२ धूर फवारणी यंत्र, ४ रिसा यक्लर, २४ डम्पर, ३ ट्रॅक्टर, ९ पाण्याचे टँकर, १० विद्युत पंप आणि ७ जनरेटरचा स्वच्छतेच्या कामात उपयोग करण्यात आला. त्यासोबतच २० जेसीबी, ४० डीपी, ५० बीआरसी, ८ हायवा ट्रक, ३५ जेटींग, १२१ घंटा गाडी, २९४ छोटी गाडी, १३१ कॉम्पॅक्टर, २९ बिन लिफ्टर आणि ४० टिप्परचाही उपयोग करण्यात आला.
याशिवाय शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका यांचेकडूनदेखील मनुष्यबळ व साधनसामुग्री उपलब्ध करण्यात आली होती. २७ जुलै रोजी एका दिवसात २२८ टन कचरा, २६.५ टन गाळ स्वच्छ करण्यात आला. ३३.५३ टन तुटलेल्या झाडाचा कचरा उचलण्यात आला आहे.
रविवारी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जि. नाशिक (दिंडोरी प्रणीत) व पुणे महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये १६२ टन कचरा, ६४ टन गाळ स्वच्छ करण्यात आला. झाडांची कटिंग करून २६ टन कचरा उचलण्यात आला आहे. या कामाकरिता १५ जेसीबी, ११ डीपी, २ बी.आर.सी., १५ हायवा, २४ जेटींग मशीन, ११ घंटागाडी, ७५ छोटा हत्ती, ८ कॉम्पॅक्टर, ३ बिनलिफ्टर, १० टिपर वापरण्यात आले.
पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीएच्या शोध व बचाव पथकामार्फत पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या अक्षय साळुंखे या युवकाचा मृतदेह २७ जुलै रोजी नदीपात्रात शोधण्यात आला. तर दिनकर कुंभार या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या शोध घेण्यात येत आहे.
पूरग्रस्त भागातील स्वच्छताविषक कामे पूर्ण करण्यात आली असून रोगराई पसरू नये यासाठी जंतुनाशक फवारणीदेखील करण्यात आली आहे. याकामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी महापलिका आयुक्त डॉ. राजेन्द्र भोसले, अतिरिक्त महापालिका आयुक्त, महानगरपालिकेच्या विविध विभागांचे खातेप्रमुख त्याअंतर्गत , क्षेत्रिय व परिमंडळ स्तरावरील अधिकारी, कर्मचारी व सेवक कार्यरत आहेत. स्वच्छता विषयक व आपत्कालीन तक्रारीसाठी पुणे महानगरपालिकेतर्फे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून प्रत्येक क्षेत्रिय कार्यालायातदेखील नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. नागरिकांनी स्वच्छता विषयक मागणी तक्रारीकरिता ०२०-२५५०१२६९ व २५५०६८०० या क्रमांकावर किंवा क्षेत्रीय कार्यालयाच्या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी केले आहे.