इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः गेल्या महिनाभरात दिल्लीत टोमॅटोच्या दरात किलोमागे ३७ रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत टोमॅटोचे भाव नव्वद ते शंभर रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. या महागाईमुळे दिल्लीच नाही तर देशातील बहुतांश ग्राहक हैराण झाले आहेत. आता सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना दिलासा देत केंद्र सरकारने टोमॅटो ६० रुपये किलोने विकण्याची घोषणा केली आहे. त्याची जबाबदारी राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ म्हणजेच ‘एनसीसीएफ’ ला देण्यात आली आहे.
‘एनसीसीएफ’ उद्या (ता.२९)पासून आपल्या केंद्रांवरून सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री सुरू करणार आहे. टोमॅटोच्या वाढत्या किमतींपासून दिलासा देण्यासाठी नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (‘एनसीसीएफ’) सोमवारपासून राष्ट्रीय राजधानी क्षेत्र-दिल्ली प्रदेशात साठ रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने टोमॅटोची विक्री सुरू करणार आहे. उत्पादन केंद्रांमध्ये नुकत्याच झालेल्या पावसामुळे पुरवठा खंडित झाल्यामुळे टोमॅटोच्या किमती वाढल्या असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. ‘एनसीसीएफ’ ने निवेदनात म्हटले आहे, की ही सुविधा २९ तारखेपासून सुरू होईल आणि येत्या काही दिवसांत हळूहळू दिल्ली-एनसीआरमधील इतर ठिकाणी विस्तारित होईल.
अनुदानित टोमॅटो कृषी भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी कॉलनी, हौज खास, संसद मार्ग, आयएनए मार्केट आणि नोएडा, रोहिणी आणि गुरुग्रामच्या अनेक भागांसह विविध ठिकाणी उपलब्ध असतील. या उपक्रमाचा उद्देश बाजार स्थिर करणे आणि ग्राहकांना पुरेशी किमतीत टोमॅटो उपलब्ध करणे हा आहे.