नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्राणघातक हल्याच्या गुह्यात तब्बल चार महिन्यांपासून गुंगारा देणा-या सराईतास पोलीसांनी गजाआड केले आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने सामनगाव परिसरात केली असून संशयितास उपनगर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
निलेश शंकर शहा (२६, रा. सामनगाव रोड, नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गेल्या ७ एप्रिल रोजी जेलरोड येथील सानेगुरूजी नगर भागात ही घटना घडली होती. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र संशयित घटनेनंतर पसार झाला होता. गेली चार महिने तो पोलीसांना गुंगारा देत होता.
संशयित शनिवारी (दि.२७) सामनगाव परिसरातील पॉलीटेक्निक कॉलेज भागात असल्याची माहिती मिळाल्याने युनिट २ च्या पथकाने सापळा लावून संशयिताच्या मुसक्या आवळल्या.ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार विवेकानंद पाठक, अंमलदार मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, महेश खांडबहाले, विशाल कुंवर, समाधान वाजे, तेजस मते, प्रवीण वानखेडे आदींच्या पथकाने केली.
….