इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीःमहाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष, भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी वर्णी लावण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची दीड वर्षातच उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रपती कार्यालयाकडून शनिवारी रात्री दहा राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांची घोषणा करण्यात आली. ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत असून यंदा अस्थिर राजकीय परिस्थितीची शक्यता असल्याने राधाकृष्णन यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते.
नागपूरचे बनवारीलाल पुरोहित पंजाबचे राज्यपाल होते. त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला असून त्यांच्या जागी आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानचे भाजप नेते ओमप्रकाश माथूर (सिक्कीम), त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री जिष्णुदेव वर्मा (तेलंगणा), माजी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार (झारखंड), आसामचे माजी खासदार रमण डेका (छत्तीसगड), सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य (आसाम) व सी.एच. विजयशंकर (मेघालय) तर गुजरातचे निवृत्त आयएएस अधिकारी के. कैलाशनाथन पुद्दुचेरीचे राज्यपाल असतील.