नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मंदिराच्या गाभा-यातील प्रवेशद्वाराला ठोकलेला चांदीचा पत्रा आणि खिळे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना प्रसिध्द कपालेश्वर महादेव मंदिरात घडली. स्टीलच्या दरवाजाच्या कुलूप खोलून भामट्यांनी ही चोरी केली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल सोपान शिनगाण (रा.नांदूरनाका) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. शिणगाण गोदाघाटावरील श्री कपालेश्वर मंदिराचे व्यवस्थापक आहेत. गेल्या शुक्रवारी (दि.१२) रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील स्टीलच्या दरवाजाचे कुलूप उघडून ही चोरी केली.
गाभा-याच्या प्रवेशद्वाराला असलेल्या श्री च्या पादुकांभोवती असलेला सुमारे सात हजार रूपये किमतीचा चांदीचा अर्धगोलाकार पत्रा आणि चांदीचे खिळे चोरून नेले. या घटनेने मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अधिक तपास उपनिरीक्षक प्रदिप गायकवाड करीत आहेत.