इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देशातील पाच राज्याच्या निवडणुका आता रंगात आल्या असून सर्व राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आता या धामधुमीत चित्रही स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे एकुण मतदारांचा कलही हळूहळू समजू लागला आहे. अशा वेळेस केलेला सर्व्हे थोडा बोलका असतो. कारण उमेदवारी जवळपास निश्चित झालेली असते. त्यामुळे मतदारही काहीसे स्पष्ट बोलतात. अशातच ‘एबीपी न्यूज सी-वोटर’ने सर्वे केला असून त्यात दोन राज्यात काँग्रेस आघाडी मिळू शकते. तर भाजप एका राज्यात यश मिळू शकते. उर्वरीत दोन राज्यात मात्र प्रादेशिक पक्षाची सरशी होणार असल्याचा अंदाज आहे.
छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोरम आणि तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीचा हा सर्व्हे असून त्यात मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये काँग्रेस तर राजस्थानमध्ये भाजपला यश मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तेलंगणामध्ये बीआरएस व मिझोरामध्ये नॅशनल फ्रँटचे पारडे जड असल्याचे म्हटले आहे.
मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. या ठिकाणी काँग्रेसला यश मिळण्याची शक्यता आहे. २३० जागा असलेल्या मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे ११८ ते १३० उमेदवार निवडून येऊ शकतात. त्याचप्रमाणे भाजपाला ९९ ते १११ जागांवर विजय मिळू शकतो. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता असून ती कायम राहणार असल्याचे सर्व्हेमध्ये दिसत आहे. या राज्यात विधानसभेच्या ९० जागां आहे. येथे काँग्रेसला ४५ ते ५१ जागांवर आघाडी तर भाजपाला ३६ ते ४२ जागा मिळू शकतात. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता जाऊ शकते. या राज्यात २०० जागा असून भाजपाचे ११४ ते १२४ उमेदवार निवडून येऊ शकतात. तसेच, काँग्रेसला ६७ ते ७७ जागा मिळू शकतात.
मिझोरमध्ये ४० जागां असून त्यात नॅशनल फ्रँटला १७ ते २१, काँग्रेसला ६ ते १० आणि झेडपीएम आघाडीला १० ते १४ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तेलंगणात भारत राष्ट्र समिती (बीआरएस) सत्तेत आहे. येथे काँग्रेसने मोठे आव्हान उभे केले असले तरी बीआरएस पुन्हा सत्तेत येऊ शकते. या राज्यात ११९ जागा आहेत. त्यात बीआरएसला ४९ ते ६१ आणि काँग्रेसला ४३ ते ५५ जागा मिळू शकतात.
एकुणच हा अंदाज असला तरी तो खरा ठरतो की यात बदल होतो हे महत्त्वाचे आहे. सर्व्हे अखेरच्या टप्यात आल्यानंतर मात्र यात खरे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान या निवडणुकीत या सव्हेनुसार निकाल लागला तर कोणालाच फायदा होणार नाही. भाजपला एक राज्य गमावावे लागेल तर एका राज्यात सत्ता मिळणार आहे. काँग्रसचेही तेच आहे. दोन राज्यात सत्ता होती ती कायम राहणार आहे. फक्त अदलाबदल होऊ शकते. प्रादेशिक पक्षाची तीच स्थिती आहे.