नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक पुणे मार्गावरील खांडरेमळा भागात दरोडेखोरानी दोघा सुरक्षा रक्षकांना चाकूचा धाक दाखवत धुमाकूळ घातला. सहा सात दरोडे खोरांच्या टोळक्याने बंगल्याच्या आवारातील बोअरींगमधील तीन इलेक्ट्रीक मोटारी आणि एका बंद बंगल्यातून फिटींगचे साहित्य काढून पोबारा केला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पाचुराम रामतिरथ हरभजन उर्फ आकाश (२१) या सुरक्षा रक्षकाने याबाबत फिर्याद दिली आहे. पाचुराम हरभजन कुलदीप लोकवाणी यांच्या खांडरेमळा परिसरात सुरू असलेल्या बंगल्याच्या बांधकाम साईटवरील वॉचमन आहे. गुरूवारी (दि.२५) रात्री पाचुराम हरभजन व अमितकुमार हे दोघे वॉचमन साईटवर गप्पा मारत बसलेले असतांना ही घटना घडली. अचानक आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दोघा वाचमनांना धारदार चाकू लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी काही दरोडेखोर लोकवाणी यांच्या तर काही अमोल सातपुते आणि दिनेश खंडारे यांच्या बंगल्याच्या दिशेने गेले.
संशयितांनी बोअरींगच्या तीन मोटारी व राजू मोरे यांच्या घरातील लिफ्ट फिटींगचे साहित्य सामान काढून आणत सुमारे १ लाख दहा हजार रूपये किमतीचा मुद्देमाल पळविला. दरोडेखोरांनी पोबारा केल्यानंतर बंगला मालकांना घटनेची माहिती देण्यात आल्याने उपनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.