नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रेमप्रकरणातून एकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताने अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण करून लॉजमध्ये डांबून ठेवल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडकोतील युवतीने याबाबत फिर्याद दिली आहे. पीडिताचे २०२० पासून एका तरूणाबरोबर प्रेमसंबध आहेत. महामार्गावरील डेक्कन पेट्रोलपंप परिसरातील हॉटेल रॉयल ईन या लॉजींग बोर्डींगवर बोलावून घेत संशयिताने मुलीवर बळजबरीने बलात्कार केला होता. यावेळी त्याने अश्लिल फोटो व व्हिडीओ आपल्या मोबाईल मध्ये काढले होते. गेल्या चार वर्षापासून वेळोवेळी या लॉजमध्ये संशयिताने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला असून शुक्रवारी (दि.२७) मुलीस लॉजवर येण्यास भाग पाडून संशयिताने मारहाण करीत डांबून ठेवल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे.
दुपारच्या सुमारास मुलगी लॉजवर भेटण्यासाठी गेली असता संशयिताने तिला मारहाण केली. यावेळी मुलीने बचावासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याने रूमचा दरवाजा बंद करून बाहेर जाण्यास मज्जाव केला. मुलीने पोलीसांशी संपर्क साधल्याने याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येवून तो मुंबईनाका पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे.