इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : खंडणीच्या त्रासाला कंटाळून दोन स्पा मालकांनी सहा लाखांची सुपारी देऊन गुरुसिद्धप्पा वाघमारे याची हत्या केली. हत्या झालेल्या गुरू वाघमारेच्या दोन्ही मांड्यावर २२ नाव गोंदवली असून माझ्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास हे लोक जबाबदार असतील, असे त्याने म्हटले आहे. या २२ लोकांची पोलिस चौकशी होणार आहे.
वरळीतील स्पामध्ये हत्या झालेल्या वाघमारे हत्या प्रकरणात मोठे गौप्यस्फोट होत आहे. दरमहा द्याव्या लागणाऱ्या खंडणीला वैतागून गुरूच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. गुरुसिद्धप्पाच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेकडून तीन तर वरळी पोलिसांकडून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुरू वाघमारे हा स्पा मालकांना खंडणीसाठी दर महिन्याला त्रास देत होता. त्यांना ब्लॅकमेल करीत होता. ज्या स्पामध्ये त्याची हत्या झाली, त्या स्पाच्या मालकाकडून वाघमारे आठ ते दहा वर्षापासून खंडणी घेत होता.
शत्रू कधीतरी तरी आपला काटा काढतील अशी शंका गुरूला होती. त्यामुळे त्याने आपल्या शत्रूंची नावे दोन्ही मांड्यावर गोंदवली होती. माझ्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास हे लोक जबाबदार असतील असे त्याने लिहिले होते. त्यामध्ये हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीचेही नाव आहे. माझ्या दुश्मनांची नावे डायरीत असून, चौकशी करून कारवाई करावी, असे वाघमारेने स्वतःच्या मांडीवर गोंदवले होते. या २२ नावांमध्ये स्वतःच्याच कुटुंबातील दोन सदस्यांची नाव असल्याचे समोर आले आहे.
गुरूच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने नालासोपारामधून एकाला आणि राजस्थानच्या कोटामधून दोन आरोपींना अटक केली आहे. वरळी पोलिसांनीही स्पाच्या मालकाला अटक केली आहे. मुंबई पोलिसांकडून आणखी काही लोकांची चौकशी सुरू आहे. नावे गोंदवलेल्या यादीत गुरुसिद्धप्पाच्या खुनाची सुपारी दिलेला स्पा मालक संतोष शेरेकरचेही नाव होते. खंडणीखोर गुरूला शेरेकरकडून याआधीही अनेकवेळा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.