नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेकडे तसेच नाशिक शहराच्या इतर महत्वाच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार २९ जुलै रोजी विल्होळीच्या जैन मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात चार चाकी वाहने नेऊन रस्ता रोको करण्याचा तसेच त्याबाबत ठोस निर्णय होईपर्यंत टोल न भरण्याचा एकमुखी निर्धार विख्यात बांधकाम व्यावसायिक व सिटीजन फोरमचे मार्गदर्शक जितूभाई ठक्कर, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या नाशिक मधील विविध प्रमुख संघटनांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या मागण्यांबाबत पत्र व ट्विट करण्याच्या निर्णयही यावेळी घेण्यात आला.
नाशिक महानगरातील उद्योग,व्यवसाय, डॉक्टर, बांधकाम व्यवसायिक,लेखापरीक्षक, आर्किटेक्ट ट्रान्सपोर्ट, टुरिस्ट, घाऊक व किरकोळ व्यापारी व सर्वच जवळपास २६ प्रमुख संघटना चे प्रमुख प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. नाशिक-मुंबई महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.ठीकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे वाहने कासवगतीने हाकावी लागतात.अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. १८० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी वाहनांना आठ ते दहा तास वेळ लागत आहे. याबाबत विविध पक्षांनी आंदोलनही केली. आमदार,खासदारांनी याविरुद्ध आवाज उठवूनही परिस्थितीत काही सुधारणा झाल्याचे दिसत नाही.
पालकमंत्री दादा भुसे यांनी सुद्धा महामार्ग अधिकाऱ्यांना याबाबत अल्टिमेटम दिला आहे. परंतु सुस्त यंत्रणा जागी होणार का हा खरा सवाल आहे असे उद्गार यावेळेस अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काढले. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मुंबईला जाणाऱ्या नागरिकांचे व्यावसायिकांचे डॉक्टरांचे व उद्योजकांचे तर प्रचंड हाल होत आहेत. मालांची वाहतूक धिम्या गतीने होत आहे. वाहतुकीच्या प्रचंड कोंडीला वाहतूकदारांना सामोरे जावे लागते.मालाची ने-आण करणारी अवजड वाहने तर दीर्घकाळ अडवून ठेवली जातात. त्यामुळे उत्पादन आणि आयात निर्यातीवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे या रस्त्याकडे महामार्ग प्राधिकरणाने सर्वच संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन त्याची दुरुस्ती करावी आणि मुंबई ते नाशिक वाहतूक जलतगतीने व्हावी यावर मार्ग काढण्यास व उपाययोजना सुचविण्यास आयोजित या बैठकीत सर्वच संघटनांनी नाशिक मुंबई रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक भूषण मटकरी यांनी केले. डॉ.हेमंत कोतवाल,डॉ.सुधीर संकलेचा,सचीन जोशी,भावेश ब्राह्मणकर, सचिन अहिरराव,पियुष सोमानी, सचिन कापडणीस,तन्मय टकले, वास्तू विशारद निलेश चव्हाण,नरेडकोचे अध्यक्ष सुनिल गवादे, चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय सोनवणे,उमेश वानखेडे,आयमा अध्यक्ष ललित बूब, क्रेडाई अध्यक्ष कुणाल पाटील, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष विजय बाविस्कर, तन्मय टकले,वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्रनाना फड टुरिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर वाघचौरे आदींनी यावेळी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
रुग्णवाहिका वेळेत मुंबईला पोहोचू न शकल्याने दोन रुग्ण दगावल्याचे आयएमए अध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा यांनी निदर्शनास आणले. वेळेवर पोहोचू नाही शकल्याने अनेकांचे फ्लाईट मिस झाले. अनेक विद्यार्थ्यांना,उद्योजक तसेच नागरिकांना त्याचा दररोज जोरदार फटका बसत आहे.आणि त्यामुळे हा रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडावे आणि मान्य मागण्या होईपर्यत टोल भरू नये असेच सर्वांनी सांगितल्यानंतर वरील प्रमाणे निर्णय घेण्यात आल्याचे जितूभाई ठक्कर आणि धनंजय बेळे व सर्व पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दीर्घकाळ उपाययोजना करण्यास विलंब लागणार असल्याने २४ तासात युद्ध पातळीवर काहीही करून करून खड्डे त्वरित बुजवावेत अशी जोरदार मागणी जितू भाई ठक्कर यांनी यावेळी केली.वाहतुकीची कोंडी होत असलेल्या ठिकाणी पोलिसांची संख्या वाढवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यावर भर देण्याची मागणीही करण्यात आली. या प्रश्नाबाबत पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक तातडीने घेण्यात यावी अशी मागणीही उपस्थितांनी केली. येत्या २ ऑगस्ट ला नाशिक मध्ये येणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचाही निर्णय यावेळी झाला.
बैठकीस निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार,राजेंद्र अहिरे,राजेंद्र वडनेरे, मनीष रावल,विरल ठक्कर, रवींद्र झोपे, डॉ.सचिन गुळवे, डॉ.हेमंत कोतवाल, अमित अलई,नितीन आव्हाड,अखिल राठी,किरण वाजे, एस.के.नायर, अरुण सूर्यवंशी,शंकर धनावडे, डी.जे. हंसवानी, किरण वाजे, कैलास पाटील, सतीश कोठारी,संदीप बदाने, नितीन वागस्कर,सुधीर बडगुजर, सुरेश चावला, आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत गांभीर्यपूर्वक व तीव्रपणे झालेल्या या बैठकीचे आभार प्रदर्शन आशिष नहार यांनी मानले.