निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड येथील बस स्थानकावर दोन जिवलग मित्रांमध्ये मोबाईल वरून झालेल्या वादातून चाकूने वार केल्याने सद्दाम फारूक शेख यांचा खून केल्याप्रकरणी रामभाऊ उर्फ प्रेम निवृत्ती पवार यास निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए व्ही गुजराथी यांनी जन्मठेपेची व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की चांदवड येथील बस स्थानकावर मोबाईल देणे घेण्याचे कारणावरून वाद होऊन राग आल्याने प्रेम निवृत्ती पवार रा.आडगाव (ता.चांदवड) यांनी चांदवड येथील पिकअप भाड्याने चालवण्याचा व्यवसाय करणारा चालक सद्दाम फारुख शेख याचा दिनांक १७ एप्रिल २०१९ रोजी दुपारी पावणेचार वाजता चाकूने धारदार वार केले छाती पोटावर आणि दंडावर मोठ्या प्रमाणावर वार झाल्याने सद्दाम फारुक शेख यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मयत सद्दामचा भाऊ इमरान फारुक शेख याने पोलीस कार्यालयात फिर्याद दिली होती. चांदवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये तपास करून संशयीत प्रेम निवृत्ती पवार याचे विरोधात निफाड न्यायालयात खटला दाखल केला होता. जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता आर. एल .कापसे यांनी सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासले सर्व साक्षी पुरावे लक्षात घेता जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी प्रेम निवृत्ती पवार यास जन्मठेपेची व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सहाय्यक सरकारी वकील ॲड. आर .एल .कापसे यांनी काम पाहिले.