माणिकराव खुळे
आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे रविवार १ ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून मुंबईसह संपूर्ण कोकणात व सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच धरणक्षेत्रात मात्र जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते. सोमवार २ ऑक्टोबर गांधी जयंतीपासून मात्र विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्हे वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात उघडीपीची शक्यता जाणवते. या आठ जिल्ह्यात मात्र २ ते ८ सप्टेंबर च्या आठवड्यात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे.
सध्या २५ सप्टेंबरपासून होत असलेला पाऊस हा रब्बी हंगामातील दुसऱ्या आवर्तनाचा पाऊस असून तिसऱ्या आवर्तनातील किरकोळ पाऊस ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पुणे नगर व उत्तर सातारा जिल्ह्यात होवु शकतो, असे वाटते. महाराष्ट्रासाठी ५ ते १० ऑक्टोबर असा सरासरी पाच दिवसाचा परतीच्या पावसाचा कालावधी असला तरी ‘परतीचा पाऊस ‘ ह्या नावाखाली तो होतोच असेही नाही. त्या अगोदर व नंतरही होणारा पाऊस महत्वाचा समजावा.
सध्या २५ सप्टेंबरला राजस्थानमधून परतलेला नैरूक्त मान्सून अजुन जागेवरच स्थिर असून पाच दिवसात त्याने माघारीची विशेष प्रगती दाखवली नाही. त्याचप्रमाणे वायव्य भारतात त्याच्या परतीसाठी सध्या वातावरण अनुकूलच आहे. येत्या तीन दिवसात कदाचित तेथून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे उत्तर भारतातील पर्यटनासाठी सध्याचा काळ उत्तम असु शकतो, असे वाटत आहे.
आज बंगाल उपसागरात नवीन कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. एमजेओ सध्या भारत सागरीय क्षेत्रातच असून त्याचा आम्प्लिटुडे १ पेक्षा अधिक असून नवीन निर्मित कमी दाब क्षेत्राला त्याची मदत होवु शकते. पण एमजेओ २ ऑक्टोबरनंतर मात्र भारत सागरी व भुभाग परिक्षेत्राच्या बाहेर पडत असून त्याचे पुढे मार्गक्रमण होत आहे. सध्या एल निनो सक्रिय असुन पुढील काळात अजून तीव्र होण्याची शक्यता असली तरी आयओडी नुकताच धन अवस्थेकडे झुकू लागला आहे.
मंगळवार ३ सप्टेंबर पासून पावसाची उघडीपीची शक्यता पाहता द्राक्षेबाग छाटणी, उन्हाळ कांदा रोपं टाकणी, उर्वरित शिल्लक लाल कांदा लागवड तसेच रब्बी ज्वारी, हरबरा इ.पेर करावयास हरकत नसावी , असे वाटते. अर्थात ह्याबाबतचा निर्णय मात्र शेतकऱ्यांनी स्वतःच्या विवेकाच्या कसोटीवर घ्यावा, असे वाटते. कारण रब्बीच्या तिसऱ्या आवर्तनातील किरकोळ पाऊस ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पुणे नगर व उत्तर सातारा जिल्ह्यात होवू शकतो, तर इतरत्र ढगाळ वातावरणही असू शकते .