इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेत पराभव झाल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांनी तशी इच्छाही बोलून दाखवली. मला गद्दारांना पाडायचं आहे असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. उध्दव ठाकरे यांनी आदेश दिल्यास मी निवडणूक लढवणार असेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने बाजी मारल्यानंतर खैरे यांना ती गोष्ट जिव्हारी लागली आहे. त्यामुळे त्यांनी आता थेट त्याचा वचपा काढण्यासाठी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यात लोकसभेत खासदार असलेले पण, निवडणुकीत पराभूत झालेले अनेक माजी खासदार आता विधानसभेची चाचपणी करत आहे. त्यात शिंदे गटाने दोन माजी खासदारांना विधान परिषदेवर संधी दिली. तिकीट नाकारल्यामुळे त्यांना ती संधी मिळाली. आता लोकसभेत पराभूत झालेले बहुतांश पक्षाचे उमेदवार विधानसभेत इच्छुक आहे. पण, पक्ष त्यांना तिकीट देतो की पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत वाट बघायला लावतो हे पुढील काळात स्पष्ट होईल.