इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात झालेल्या दंगलीतील नुकसानीची वसुली आरोपींकडून करण्याच्या कृत्यावर सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला असताना बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून झालेल्या दंगलीतील ११ कोटी रुपयांच्या नुकसानीची वसुली संबंधित आरोपींकडून करण्यात येणार आहे. या नुकसानीच्या वसूलीबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बीड जिल्हयात हिंसक वळण लागले होते. आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर व अन्य नेत्यांच्या मालमत्ता जाळण्यात आल्या. माजलगाव नगरपालिकेचे कार्यालय जाळण्यात आले. त्यात सुमारे ११ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दंगलखोरांकडून नुकसानीची वसुली करण्याच्या अन्य राज्यांतील निर्णयाची अंमलबजावणी आता महाराष्ट्रातही होणार आहे. तसा अहवाल तयार करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अशा आरोपींच्या मालमत्ता जप्तीच्या विरोधात कठोर शब्द वापरले असताना आता उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्रात आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत.
मराठा आरक्षणानंतर उसळलेल्या दंगलीप्रकरणी १४४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. बीड शहरातील बसस्थानकावर उभ्या असलेल्या अनेक बसची तोडफोड करण्यात आली. त्यात काचा फोडल्याने मोठे नुकसान झाले. दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन आता काचा बसवण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी वीस लाखांच्या काचा हिमाचल प्रदेशमधून मागवण्यात आल्या आहेत.