इंडिया दर्पण ऑनलााईन डेस्क
छत्रपती शिवरायांकडून पाहणी करण्यात आलेला ऐतिहासिक घोडबंदर किल्ला भाड्याने देण्याचा घाट मिरा-भाईंदर महापालिकेने घातला आहे…
ठाण्यातील ऐतिहासिक वास्तूंबद्दल मी अलिकडेच विधानसभेत बोललो होतो. आज घोडबंदर किल्ल्याची बातमी वाचून धक्काच बसल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्र वैभव – राज्य संरक्षित स्मारक योजने’ अंतर्गत महापालिकेकडे देखभाल दुरुस्तीसाठी वर्ग करण्यात आलेला किल्ला उत्पन्न मिळवण्यासाठी भाडेतत्त्वावर द्यायला लागतोय यावरून प्रशासनाच्या तिजोरीत किती खडखडाट आहे, याची कल्पना येईल. किल्ल्यांच्या संरक्षणासाठी जर सरकारकडे पैसे नसतील तर कररुपाने आलेला लोकांच्या कष्टाचा पैसा कुणाच्या घशात जातोय?
नव्याची निर्मिती करता येत नाही आणि जुनं जपायची अक्कल नाही, अशी या सरकारची गत झाली आहे. नोक-यामध्ये कंत्राटी पद्धत, सरकारी आस्थापनं उद्योगपतींना आंदण आणि आता ऐतिहासिक वास्तू भाडेतत्त्वावर… समस्त शिवप्रेमींसाठी ही संतापाची बातमी असून राज्यात छत्रपतींच्या वास्तूंना भाडेतत्त्वावर देण्याची नामुष्की या सरकारवर आली असेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेने वाटचाल करतोय, हे वेगळं सांगायला नको.
पाहुण्यांना शिवरायांच्या प्रतिमा भेट देऊन पोकळ शिवप्रेम दाखवण्यापेक्षा गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी खर्च केला तर ती छत्रपती शिवरायांना खरी आदरांजली ठरेल.








