मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात पावसामुळे मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी ,रायगड, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
कोल्हापूरला शुक्रवार व शनिवारी शाळा बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शाळेच्या वेळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाचे काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे. पंचगंगा पाणीपातळी पोहोचली ४३.६ आहे. तर राधानगरी धरणाचे उघडले पाच दरवाजे उघडले असून बालिंगा पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाकडून शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालयाला सुट्टी घोषित करण्यात आली आहे. तर पुण्यातही शाळा, कॅालेज आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे येथेही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.