मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईमध्ये मनसेचा पदाधिकारी मेळाव्यात मनसे नेत राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारला टोला लगावला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील मूळ प्रश्नांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही; मात्र राज्यात सध्या लाडकी बहीण, लाडका भाऊवरून राजकारण सुरू आहे, असे सांगून ते म्हणाले, की लाडकी बहीण, भाऊ एकत्र असते तर दोन पक्ष आज एकत्र राहिले असते. असे सांगत त्यांनी अजित पवार व सुप्रिया सुळे यांना चिमटा काढला.
मुंबई येथे झालेल्या या मेळाव्यात राज यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले, की विधानसभेत मनसेच्या आमदारांना काही करून सत्तेत बसवायचे आहे. त्यासाठी आम्ही तयारीला लागलो आहोत.
यावेळी ते म्हणाले की, सरकार योजना काढत आहेत; मात्र सरकारकडे त्यासाठी पैसे आहेत का? रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत असेही त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या राजकारणावर भाष्य केले. सध्या एकमेकांना केवळ शिव्या दिल्या जात आहेत. लोकांचे लक्ष विचलित करून निवडणूक भरकटवली जाते. कोण कुठे गेले?, कोण कोणत्या पक्षांत आहे? काहीच समजत नाही’, त्यांनी सांगितले.
मराठी लोकांनी अमेरिकेत व्यवसाय उद्योगात मोठं यश मिळवलं
मध्यंतरी २०,२५ दिवस मी अमेरिकेत होतो, तिथे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात माझी मुलाखत होती. या निमित्ताने तिथे स्थायिक झालेल्या असंख्य मराठी बांधव-भगिनींशी भेट झाली. त्याच दरम्यान एकदा एक मराठी तरुण शिवलकर आडनावाचा मला भेटायला आला, म्हणाला की मी तुमची लहानपणापासून भाषणं ऐकत आलो. आणि त्यातून प्रेरणा घेऊन इथे मी स्वतःच रेस्टोरंट सुरु केलं आहे. त्याच्या रेस्टोरंटला मी कसंही करून भेट द्यावी अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याच्या रेस्टोरंटला गेलो. आतमध्ये जवळपास १०० आणि बाहेर ५० लोकं बसतील अशा क्षमतेचं ते रेस्टोरंट होतं, जे मी गेलो तेंव्हा पूर्ण भरलेलं होतं. आणि मला कळलं की तिकडे टेबल मिळायला कमीत कमी दीड तासांची प्रतीक्षा असते. भारतीय आणि अभारतीय लोकं मोठ्या प्रमाणावर आपलं जेवण जेवायला येतात हे पाहून मला खूप आनंद झाला.
एकूणच आपल्या मराठी लोकांनी अमेरिकेत व्यवसाय उद्योगात मोठं यश मिळवलं आहे हे पाहून खूप छान वाटलं.
हे सगळं असताना वाचवण्याचा विचार
अमेरिका, कॅनडा या दोन देशांमध्ये अनेक मोठे तलाव आहेत, पण त्यातले ५ मोठे तलाव आहेत ते इतके मोठे आहेत की ते जर तुम्ही गुगल अर्थ किंवा इतर एखाद्या माध्यमावर जाऊन बघायला गेलात तर तुम्हाला त्याचा अतिप्रचंड आकार दिसेल. हे तलाव इतके मोठे आहेत की अवकाशातून पण हे तलाव दिसतात. या तलावांच्यातला एक छोटा ठिपका म्हणजे जगप्रसिद्द नायगारा धबधबा. इतकं अतिप्रचंड पाणी, जंगलं असलेला हा प्रदेश आहे. इथे फिरताना मला नेहमी एक जाणवत रहायचं की हे सगळं असताना पण इथे पाणी वाचवणं, जंगल वाचवणं याचा किती विचार करतात. पण आपल्याकडे हा विचार होताना दिसत नाही. दरवर्षी मे महिना आला की, पाऊस पडेल का? पडला तर पुरेसा पडेल का? दुष्काळ तर नाही ना पडणार? अशा चिंतांनी महाराष्ट्र ग्रासलेला असतो. पण म्हणून जे पाणी पावसाच्या रूपाने येतं त्याचं नियोजन आपण करत नाही. आपण आपली जंगलं पण वाचवत नाही. कुठलंही सरकार असू दे त्याला या गोष्टीशी काही घेणंदेणं नाही. आपल्याकडे अंतिमकर्म करायला दहन करायला लाकडं वापरतात, पण माझं म्हणणं आहे की काय हरकत आहे आपण विद्युतदाहिनीचा वापर केला तर? किती लाकूडतोड थांबेल याचा आपण विचार करतोय का? सरकारने मग ते केंद्रातील असो की राज्यातील, त्यांनी विद्युतदाहिन्यांवर भर दिला तर प्रचंड जंगलतोड वाचेल. आपण आपल्या धर्माबद्दल अभिमानी असलं पाहिजे, त्यात जे सांगितलं आहे ते पाळायला हरकत नाही फक्त हे करताना काळाच्या ओघात आपण निसर्गाची हानी करत नाही आहोत ना हे देखील बघायला हवं.
मीच रेडकार्पेट घालतो.
आज कुठला आमदार कुठल्या पक्षाचा, कुठल्या गटाचा आहे हे कळत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांची स्पर्धा कुठवर जाईल हे सांगता येत नाही. मध्ये मला कोणीतरी सांगितलं की आपल्याकडचे एक, दोन लोकं दुसरीकडे जायला निघालेत. मी म्हणलं जरूर जा, हवं तर जाण्यासाठी मीच रेडकार्पेट घालतो. तिथे जे आहेत त्यांचंच काही खरं नाही, यांचं काय होणार आहे.
सर्व्हे करणाऱ्या एजन्स्या
निवडणुका आल्या की सर्व्हे करणाऱ्या एजन्स्या येतात, ते सर्व्हे करतात, ती किती लोकांना भेटतात देव जाणे. पण आपल्याकडे मी मध्यंतरी पदाधिकाऱ्यांच्या टीम्स जिल्ह्या-जिल्ह्यात पाठवल्या होत्या, ते पदाधिकाऱ्यांना न भेटता, तिथल्या स्थानिकांना, पत्रकारांना भेटून त्यांचा अहवाल घेऊन मला भेटले. आता त्या टीम्स पुन्हा मी तुमच्याकडे पाठवणार आहे, त्या आता तुम्हाला भेटणार आहेत. त्यांना तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती समजवून सांगा. त्यांना प्रामाणिकपणे वस्तुस्थितीची माहिती द्या, तुम्ही जे सांगाल, जी माहिती द्याल ती मी चेक करणार आहे, त्यामुळे जे खरं आहे तेच सांगा. आणि मी आत्ताच सांगतो लढण्याची,जिंकण्याची तयारी असलेल्यानाच तिकीट मिळेल, तिकीट मिळालं आणि मी आता पैसे काढायला मोकळा असल्याना मी तिकीट देणार नाही.