इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत २२५ ते २५० जागा लढवणार असल्याची घोषणा आज केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी युती होईल असा कोणताही विचार मनात आणू नका, असे स्पष्ट करून निवडणुकीची तयारी म्हणून एक ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा सुरू करणार असल्याची घोषणा केली.
मुंबईमध्ये मनसेचा पदाधिकारी मेळावा झाला. त्या वेळी राज यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले, की विधानसभेत मनसेच्या आमदारांना काही करून सत्तेत बसवायचे आहे. त्यासाठी आम्ही तयारीला लागलो आहोत. ऐन वेळी कोणाशीतरी युती होईल असा कोणताही विचार मनात आणू नका. विधानसभा निवडणुकीत मनसे २२५ ते २५० जागा लढवणार आहे,
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील चार- पाच जणांची टीम केली असून ती प्रत्येक तालुक्यात येऊन गेली. सर्व्हे झाला. त्यानंतर आता चार-पाच दिवसांनी ते तुमच्याकडे पुन्हा येतील. तुम्हाला भेटतील. तुमच्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे, ते त्यांना सांगा. गणित कसे घडू शकते, काय करता येऊ शकते, याचा विचार करा. कोणतीही माहिती व्यवस्थित द्या. ती नीट द्या. प्रामाणिकपणे द्या. तुम्ही दिलेल्या माहितीची खातरजमा केल जाणार आहे, असे ते म्हणाले.