नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्थानबध्दच्या कारवाईत कारागृहातून बाहेर पडताच सराईतांनी शरणपूररोड भागात भव्य मिरवणुक काढल्याचा प्रकार समोर आला आहे. चार चाकीसह दहा ते पंधरा दुचाकी धारकांनी आरडाओरड व हॉर्नच्या कर्नकर्कश आवाजात ही मिरवणुक काढण्यात आल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले होते. परिसरात आपली दहशत कायम राहवी या उद्देशाने पूर्व परवानगी न घेता काढलेल्या या मिरवणुकीत तडिपारांसह शहरातील गुन्हेगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मनाई आदेशाच्या उलंघनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षद सुनिल पाटणकर, गोपाल नागोरकर,शॉन मायकल,जॉय मायकल,रॉबिनसन बत्तीसे,वैभव खंडारे,विकास नेपाळी,वेदांत चाळद (रा.सर्व बेथलेनगर,शरणपूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यातील हर्षद पाटणकर हा सराईत तर उर्वरीत सर्व संशयितांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमिवर त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई झालेली आहे. सराईत पाटणकर याच्यावर शहर पोलीसांनी एमपीडीए अन्वये कारवाई केलेली आहे. कारागृहातून तो बाहेर पडताच मंगळवारी (दि.२३) सायंकाळी महिंद्रा कंपनीच्या एक्सयुव्ही एमएच १५ जीएक्स ८७२१ ही मिरवणुक काढण्यात आली.
यावेळी उर्वरीत ससंशयितांसह त्यांच्या साथीदारांनी आरडाओरड करीत जमाव जमवून दहा ते पंधरा मोटारसायकली आणि पायी मिरवणुक काढली. बेथले नगर ते आंबेडकर चौक, साधू वासवाणी रोड व शरणपूर परिसातून ही मिरवणुक काढण्यात आली. अर्वाच्च घोषणा देत वाहनांचे हॉर्न वाजवित ही मिरवणुक काढण्यात आली. याबाबत जमादार सुधीर पाटील यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस नाईक थेटे करीत आहेत.