नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या वृध्द महिलेची शेजारच्यांनीच तब्बल सव्वा कोटी रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आजारपणात असाह्यतेचा लाभ उठवत शेजारी राहणा-यांनी धनादेश चोरून ही फसवणुक केली असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिशा टाक, किशोरभाई एन टाक, सरला टाक, देवांश टाक व विकास राजपाल रहतोगी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत विस्मत मेरी जेरेमीह (८८ रा.मिहीर सोसा.दत्तमंदिररोड ना.रोड) यांनी फिर्याद दिली आहे. जेरेमीह या लष्करात ब्रिगेडीअर पदावर कार्यरत होत्या. सेवानिवृत्तीनतर कुटुंबात दुसरे कोणी नसल्याने त्या मिहीर सोसायटीत एकट्याच वास्तव्यास आहेत. जेरेमीह वृध्द असल्याने त्यांच्याकडे सोसायटीतील सदस्यांचे येणे जाणे होते. सर्वच जण त्यांची आदराने विचारपूस करीत असल्याने त्यांचा सर्वांवर विश्वास होता. या काळात शेजारी राहणारे टाक कुटुंबियही अधुनमधून चौकशी करायचे वृध्दापकाळाने सन. २०२० मध्ये आजारपणात शेजारी राहणा-या दिशा टाक या मुलीने त्यांची देखभाल केली.
या काळात सदर युवतीने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेच्या धनादेश पुस्तकातील काही चेक चोरून बँक खात्यातील रोकडवर डल्ला मारला. ही बाब दुबई येथून परतलेला जेरेमीह यांचा भाचा अॅन्सले याच्या निदर्शनास आल्याने ही घटना उघडकीस आले. सदर युवतीने बेडवर पडलेल्या धनादेश पुस्तकातील ३८ चेकवर बनावट साक्षरी करून जेरेमीह यांच्या बँक खात्यातील १ कोटी २३ लाख ८५ हजार ३६७ रूपयांवर डल्ला मारल्याचे पुढे आले असून ही रक्कम म्यॅच्युअल फंड, फिक्स डिपॉझिट त्यावर मिळणारे व्याज आणि दरमहा मिळणा-या पेन्शन रकमेतील होती. २०२० पासून सदर युवतीने वडिल किशोरभाई टाक, आई सरला टाक, भाऊ देवांश टाक आणि मित्र विकास रहतोगी यांच्या बँक खात्यात वर्ग केल्याचे चौकशीत समोर आले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक नरेंद्र बैसाणे करीत आहेत.