मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाडमध्ये युनियन बँक विमा घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतानाच आता भारतीय स्टेट बँकेच्या मनमाड शाखेतही विमा प्रतिनिधीने फसवणूक केल्याचा एक प्रकार समोर आल्याने ठेवीदारांचे धाबे दणाणले आहे. जानेवारी २०२२ रोजी बँकेत बसणाऱ्या विमा प्रतिनिधीकडे एक महिलेने पेन्शन प्लॅन योजनेत पैसे गुंतवणूक केले होते. त्यानुसार २०२२ ते २०२४ असे तीन वर्षांचे हप्ते भरले होते. त्यापैकी पहिला हप्ता अकाऊंट वरून कापण्यात आला तर दुसरा हप्ता रोख दिला, तर तिसरा हप्ता फोनपेद्वारे भरला होता.
मात्र सदरची रक्कम बँकेत जमाच करण्यात आली नसल्याचा प्रकार समोर आला असून, एकूण सात लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.दरम्यान याप्रकरणी बँकेच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांकडून चौकशीही सुरू करण्यात आली आहे.मात्र फसवणुकीचा प्रकार समोर येऊन बँकेकडून पोलिसांत तक्रार करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान हा प्रकारामुळे स्टेट बँकेच्या ठेवीदारांच्या धाबे दणाणले असून, आणखी काही लोकांची फसवणूक झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.