निलेश गौतम, सटाणा
चालू वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने येणाऱ्या उन्हळ्यात बहुतांश भागत भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे ऎन हिवाळ्यात विहिरींना तळ गाठला आहे. रब्बी हंगाम धोक्यात येण्याची स्थिती असताना पाळीव जनावरांसाठी उन्हाळ्यात चारा टंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ नये म्हणुन शेतकरी मक्याच्या चाऱ्याला प्राधान्य देत साठवणूक करताना दिसून येत आहेत.
ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहायाने काही शेतकरी बागलाणच्या पश्चिम भागातील डांगसौंदाणेसह परीसरातून मक्याचा चारा, थेट चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगावसह तालुक्यातील मोसम व पूर्व, भागात या चाऱ्याची वाहतूक करतांना दिसत आहेत. एकरी ५ हजार किंवा ट्रॉली ला १५०० ते २००० चा दर देऊन हा चारा आपल्या पशुधन वाचविण्यासाठी घेतांना शेतकरी दिसून येत आहे.
डांगसौंदाणे भागाला ही कमी पर्जन्यमुळे काही अंशी उत्पादनात घट आली आहे, मात्र चारा हाती आला आहे. या चाऱ्याला दरवर्षी एरवी मागणी नसते अनेक वर्षी हा चारा शेतकऱ्याला फुकट देण्याची वेळ येते. मात्र या वर्षी मागणी असल्याने हा चारा पशुधनासाठी जात असल्याने शेतकरी ही अल्पदरात चारा देताना दिसून येत आहे. काही शेतकरी या चाऱ्याची कुट्टी करीत थेट आयशर अथवा ट्रक द्वारे वाहतूक करीत आहेत. यामुळे वेळ व ट्रान्सपोर्ट खर्च वाचत असल्याने लांब वाहतूक असलेले शेतकरी जागेवर कुट्टी करीत मोठ्या वाहनावर वाहतुकीस प्राधान्य देत आहेत.
रब्बी हंगामा सोबत उन्हाळ कांद्याचे ही भवितव्य पाण्या अभावी अंधकारमय झाले आहे अनेक गावात विहिरींनी आताच तळ गाठल्याने उन्हाळ कांदा लागवडीवर याचा परिणाम जाणवनार आहे. २०१९ मध्ये ही या भागातील चाऱ्याला मागणी होती हिरवा चारा म्हणुन ऊस प्रतिटन ३००० रुपये दराने चाळीसगाव तालुक्यातील व्यापारी वर्गाकडून खरेदी केला जात होता या ही वर्षी हिरव्या चाऱ्याला उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर मागणी होण्याची शक्यता आहे.