इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वसईः साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो (वय ८२) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वसईत आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी ३.३० वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी (जेलाडी) ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजल्यापासून नंदाखाल येथील होली स्पिरिट चर्च येथे अंत्यदर्शन घेता येईल. त्यांचा अंत्यविधी मिस्सा हा आजच सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास होली स्पिरिट चर्चमध्ये होणार आहे.
फ्रान्सिस दिब्रिटो यांनी १९७२ साली त्यांनी कॅथलिक धर्मगुरूपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केले. ते ख्रिस्ती धर्मगुरू असले, तरी त्यांची खरी ओळख ही पर्यावरणप्रेमी, पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते अशीच होती. पालघर जिल्ह्यात त्यांनी सातत्याने पर्यावरणाच्या बाजूने भूमिका घेतली. ‘सुवार्ता’ या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाचा स्वतंत्र ठसा उमटला. १९८३ ते २००७ या काळात ते ‘सुवार्ता’चे मुख्य संपादक होते.
‘हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली होती. वसईतील ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनी मोठी मोहीम राबविली. ‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची’ हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन केले होते.
पर्यावरण चळवळीची देखील मोठी हानी झाली – भुजबळ
ज्येष्ठ मराठी साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि पर्यावरणवादी चळवळीतील नेते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ‘सुवार्ता’ या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक विषय हाताळले, तर काही उपक्रमही राबवले. तसेच हरित वसईच्या संरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाबरोबरच पर्यावरण चळवळीची देखील मोठी हानी झाल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी श्रध्दांजली अर्पण करतांना म्हटले आहे.