इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे: पुणे शहरात बुधवारी आणि गुरुवारीही पावसाची संततधार सुरू आहे. पावासाच्या हाहाकाराने अनेक सोसायट्यांत पाणी शिरले आहे. दोनशे लोक पाण्यात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी बोटी मागवण्यात आल्या आहेत. पालकमंत्री अजित पवार ‘ॲक्शन मोड’ आले मध्ये असून त्यांनी प्रशासन हलवले आहे. पुण्यातील शाळांना सुटट्या देण्यात आल्या आहेत.
खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मुठा नदीला पूर आला आहे. पुणे शहरातील डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पुलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. पुलाची वाडी आणि एकता नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. अनेकांचे संसार पाण्यावर तरंगत आहेत. सिंहगड रस्त्यावरील एका सोसायटीत छातीपर्यंत पाणी साठल्याने इमारतीमधील नागरिकांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू बोटी मागवण्याची वेळ आली आहे.
पवार यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीची माहिती घेतली. पुण्यातील अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने तात्काळ उपायोजना करण्याचा आदेश पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहण्याच्या तसेच नागरिकांना तात्काळ मदत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
डेक्कन जिमखाना येथील पुलाची वाडीतील तीन युवकांचा टपरी हलवताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. अभिषेक अजय घाणेकर (२५), आकाश विनायक माने (२१), शिवा जिदबहादुर परिहार (१८) अशी मृतांची नावे आहेत. जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच मदत व बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासनाला नदीकाठच्या भागात आवश्यक दक्षतेचे उपाय करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. पुढील ४८ तासात धोकादायक पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी करावी, धोकादायक ओढे, नाले, पुलावरील वाहतूक बंद ठेवावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत.