इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः आगामी विधानसभा निवडणुकीच्या उपमुख्यंत्री अजित पवार मंगळवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यांशी भेट घेऊन जागावाटपाबाबत चर्चा केल्याचे समजते. त्यांच्या या भेटीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. या नेत्यांमधील चर्चेचा तपशील समजला नसला, तरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाबाबत या नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याचा अंदाज आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीतील महायुतीमधील जागावाटप, निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काय रणनीती हवी? या बाबत पवार आणि शाह यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जाते. लोकसभेत बसलेल्या फटक्याची विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ नये, याबाबत महायुतीकडून काय रणनीती आखायची, याबाबत या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुतीच्या गोटात वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.
गेल्या रविवारी शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात भाजपचे राज्यव्यापी महाअधिवेशन झाले. त्या वेळी पवार यांनी पुण्यातील हॉटेलमध्ये शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोनच दिवसांत पवार यांनी दिल्लीत जाऊन शाह यांची भेट घेतली.