नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : सहा चाकी ट्रकमधून कत्तलीसाठी गोवंश जनावरांची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या कारवाईत ३ गाईसह २२ वासरांची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेठरोडवरील राहू हॉटेल नजीकच्या गजानन पेट्रोल पंप परिसरात मंगळवारी (दि.२३) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जीजे १३ केएक्स १७९६ या सहा चाकी मालट्रकमधून कत्तलीसाठी गोवंश जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीसांनी धाव घेत ट्रकची पाहणी केली असता जनावरे क्रुरतेने कोंबलेली आढळून आली.
पोलीसांची चाहूल लागताच ट्रक चालक व त्याचा साथीदार पसार झाला असून या कारवाईत सुमारे ४ लाख २० हजार रूपये किमतीच्या २५ जनावरांची सुटका करीत पोलीसांनी चार लाखाचा ट्रक जप्त केला आहे. याबाबत अंमलदार राजाराम भोये यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार खरोटे करीत आहेत.
वडाळारोडवरील भारतनगर भागात ४२ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : वडाळारोडवरील भारतनगर भागात राहणा-या एकाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पिंटू रामदास मिसाळ असे (४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिसाळ याने सोमवारी (दि.२२) सायंकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात लाकडी वाश्याला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाचा निलेश जाधव यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार भिल करीत आहेत.
.