इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पॅरिस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने पुन्हा एकदा नीता अंबानींवर विश्वास व्यक्त केला आहे. आयओसीच्या सदस्यपदी त्यांची एकमताने फेरनिवड झाली आहे. एकूण ९३ मतदारांनी मतदान केले आणि सर्व ९३ मते नीता अंबानी यांच्या बाजूने म्हणजेच १०० टक्के झाली. नीता अंबानी २०१६ मध्ये रिओ दि जानेरो ऑलिम्पिक गेम्समध्ये प्रथमच आयओसी सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा आहेत.
पुन्हा निवडून आल्यावर नीता अंबानी म्हणाल्या, “आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची सदस्य म्हणून पुन्हा निवड झाल्याबद्दल मला खूप अभिमान वाटत आहे. मी अध्यक्ष बाख आणि आयओसी मधील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे माझ्यावरील भरोसा आणि विश्वासाबद्दल आभार मानू इच्छिते. ही पुनर्निवडणूक केवळ माझ्यासाठी एक वैयक्तिक मैलाचा दगड नाही, तर जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताचा वाढता प्रभाव दर्शविते . हा क्षण मी अतिशय आनंदाने आणि गर्वाने प्रत्येक भारतीयासोबत साजरा करू इच्छीते तसेच भारतात आणि जगभरात ऑलिम्पिक चळवळ मजबूत करण्यासाठी मी तत्पर असेल .”
नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली भारताला ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयओसी च्या वार्षिक बैठकीचे यजमानपद मिळाले आहे. २०२३ मध्ये मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये इंडिया हाऊस बांधण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडू, समर्थक आणि प्रेक्षकांसाठी जे भारतापासून दूर असलेल्या घरासारखे आहे.