नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या मतदार याद्यांतील दोष दूर करावे, अशी विनंती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली. लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी असल्याने महाराष्ट्रातील सुमारे १० टक्के मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
बुधवार, २४ जुलै रोजी नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार तसेच माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यात सुमारे सव्वा तास चर्चा झाली. यावेळी बावनकुळे यांनी एक निवेदन त्यांना दिले.
भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रातील बुथ आणि मतदार यादीत असणाऱ्या त्रुटीबद्दल माहिती दिली. २०१९ साली एका मतदारसंघात असणारे दीड लाख मते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नव्हती. यासाठी आम्ही नागपूर लोकसभा क्षेत्राचे उदाहरण या निवेदनातून दिले आहे.
मतदार यादी करा एक हजारांची
पुढे ते म्हणाले की, मतदार याद्या तयार करताना डाटा एन्ट्रीच्या परिस्थितीविषयी माहिती दिली. सोबतच एका बुथवरील मतदार यादी एक हजार मतदारांची करावी अशी विनंती केली. सोबतच वयोवृद्ध मतदारांचे वय ८५ वरून ७५ करण्यात यावे तसेच हाऊसिंग सोसायटीमध्ये १०० टक्के बुथ लावण्याची मागणी केली. एकाच इमारतीतील बुथ शेजारी लावण्यात यावे.
आयुक्तांचे त्रुटीवर लक्ष!
बुथ लेव्हलच्या अधिकाऱ्यांकडून चुका झाल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या लक्षात आल्याचे दिसून आले. फोटो नसल्याने अनेकांना मतदान करता आले नाही, हे देखील त्यांना पटवून दिले. आगामी विधानसभा निवडणूक चांगली होईल व मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता येईल, अशी अपेक्षा त्यांनी निवडणूक आयुक्तांकडे व्यक्त केली.