नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर आणि अंबडच्या उद्योजकांनी महावितरण कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचा पाढा वाचल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत कार्यकारी अभियंता चेतन वाडे यांनी याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून उद्योजकांची जाहीर माफी मागितली आणि या सर्व समस्यांबाबत जातीने लक्ष घालून १५ दिवसांच्या आत त्याचे निराकरण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
उद्योजकांच्यादृष्टीने वीज हा घटक सर्वात महत्त्वाचा गणला जातो. विजेचा लपंडावामुळे उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.तसेच त्या अनुषंगाने विविध समस्याही त्याच्यापुढे उद्भवतात.त्यामुळे या सर्व बाबींचे निराकरण करण्यासाठी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी उद्योजक आणि महा वितरणच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक निमा सभागृहात बोलावली असता कार्यकारी अभियंता चेतन वाडे यांच्यासमोर सातपूर औद्योगिक वसाहतीतील
सी-10,सी -11 तसेच प्लॉट 28मधील उद्योजकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.सातत्याने ट्रीपिंग होते त्यामुळे उद्योग तर बंद ठेवावाच लागतो.परंतु महावितरण कार्यालयात फोन केला असता कर्मचाऱ्यांकडून उद्धट उत्तरे मिळतात. दहा दिवसांपूर्वी आमच्याकडची वीज गेली असता तुम्ही कार्यालयात या घरी बसून प्रॉब्लेम सांगू नका, असे उत्तर कार्यालयाकडून मिळाल्याचे सतीश पगार या उद्योजकाने सांगितले तेव्हा सर्वच अवाक झाले होते.एकदा रात्री वीज गेली आणि महावितरणला फोन केला असता लाईनमन आले. पण तुमच्याकडे फ्युजवायर आहे का,अमुक साहित्य आहे का असे विचारून आम्हाला भांडावून सोडले.महावितरण त्यांच्याकडे टूलकिट उपलब्ध का करून देत नाही. आम्ही धावाधाव करून हे सर्व साहित्य उपलब्ध करून देतो परंतु आम्हाला खूप मनस्ताप होतो, असे नितीन खंडेलवाल आणि एम.एस.तोडवाल यांनी सांगितले.मेन्टेनन्ससाठी आम्ही कधी कधी तर 50 हजार रुपयांपर्यंत खर्च केल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.कैलास पाटील तसेच इतर बहुसंख्य उद्योजकांनीही यावेळी महावितरणच्या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनीही उद्योजकांच्या भावना तीव्र स्वरूपाच्या असल्याचे निदर्शनास आणून देत महावितरणच्या कारभारावर जोरदार आसूड ओढले. नुसता एक पाऊस आला तरी वीज गायब होते. केंद्र व राज्य सरकार एकीकडे उद्योग क्षेत्राकडे मोठ्या आशेने बघत आहे आणि दुसरीकडे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे उद्योगक्षेत्र मोडकळीस येत असेल तर ही बाब निश्चितच दुर्दैवी म्हणावी लागेल. सातपूरच्या सी 10,सी 11,प्लॉट नंबर 28 मध्ये जर सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असेल तर उद्योजकांनी जगायचे की मरायचे असा सवाल करून या सर्व बाबींवर कायम स्वरूपी तोडगा काढण्याची मागणीही बेळे यांनी केली.उप अभियंता ऋषिकेश जोगळेकर यांच्यावरही त्यांनी चांगलीच तोफ डागली. निमाचे उपाध्यक्ष राजेंद्र अहिरे,रवींद्र झोपे,रावसाहेब रकिबे यांनीही प्रश्नांची सरबती केली व महावितरणच्या अधिकाऱ्यांना या सर्व समस्यांबाबत जाब विचारला.
सातपूरमधील उद्योजकांनी ज्या काही समस्या मांडल्या त्यातील बहुसंख्य समस्यांबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगून महावितरणच्या कर्मचारी वर्गामुळे उद्योजकांना जो काही त्रास झाला त्याबद्दल कार्यकारी अभियंता चेतन वाडे यांनी बैठकीत उपस्थित सर्व उद्योजकांची चक्क माफी मागितली.जातीने लक्ष घालून येत्या पंधरा दिवसांत उद्योजकांच्या सर्व समस्यांचे आपण निराकरण करू,असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. दोन दिवसात संपूर्ण सर्व्हे करणार, वारंवार ट्रिपिंग होणार नाही याची काळजी घेणार, कर्मचारी वर्गाला समज देणार असेही ते पुढे म्हणाले.
बैठकीस मनीष रावल,राजेंद्र कोठावदे,राजेंद्र वडनेरे,कैलास पाटील,नितीन आव्हाड,सुधीर बडगुजर,उपअभियंता गणेश कुशारे,ऋषिकेश जोगळेकर,पाटील, नानासाहेब देवरे राजेश खत्री, नितीन साळुंखे यांच्यासह उद्योजक व महावितरणचे. अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.