नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पाथर्डी फाटा भागात पुमा या नामांकित कंपनीचे बनावट कपडे विक्री एका टेक्सटाईल मालकाच्या अंगलट आली आहे. कंपनीच्या छाप्यात सहा लाखांचे बनावट कपडे आढळून आले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हरिश्चंद्र नथु राव (रा.प्रशांतनगर,पाथर्डीफाटा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित टेक्सटाईल मालकाचे नाव आहे. याबाबत पुमा कंपनीचे महेंद्र सोहन सिंग (रा.राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. पुमा कंपनीचे स्वामित्व असलेल्या बनावट टी शर्ट व ट्रॅक पॅण्डची नाशकात राजरोस विक्री असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२३) विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले.
पाथर्डी फाटा परिसरातील राव टेक्सटाईल्स या दुकानात टाकलेल्या छाप्यात कंपनीचा मोठा बनावट तयार केलेला साठा आढळून आला. या ठिकाणी कंपनीचा लोगो वापरून बनावटीकरण केले जात होते. घटनास्थळावरून शिलाई मशिनसह कापलेला कापड आणि तयार बनावट कपडे असा सुमारे ५ लाख ८३ हजार ९०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक फुंदे करीत आहेत.