नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड परिसरातील जुना सायखेडा रोड भागात घराची कडी लावून घेत वकिल कुटुंबियास घराबाहेर पडण्यास अटकाव केल्याचा प्रकार समोर आला आहे. दुस-यांदा हा प्रकार घडल्याने पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात शेजारी इमारतीत राहणा-या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम मंडलिक (रा.नर्मदा सोसा.श्रीरामनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अॅड. नितीन विश्वास आडके (रा.नर्मदा सोसा.श्रीरामनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित आणि फिर्यादी एकाच सोसायटीच्या दोन वेगवेगळया विंग मधील रहिवाशी आहेत. संशयिताने गेल्या ५ जुलै रोजी मध्यरात्री अॅड.आडके यांच्या घराची कडी लावून घेत कुटुंबियास घराबाहेर पडण्यास अटकाव केला होता.
सकाळी आडके कुटुंबियांनी शेजा-यांशी संपर्क केल्याने या प्रकारावर पडदा पडला होता. मात्र गेल्या शनिवारी (दि.१३) रात्री संशयिताने ए विंगच्या टेरेसवरून प्रवेश करून अॅड. आडके यांच्या घराची बाहेरून कडी लावून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक हिवाळे करीत आहेत.