मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे येथे झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अधिवेशनानंतर आता भाजपाच्या संघटनात्मक ७८ जिल्ह्यांमध्ये २,३ आणि ४ ऑगस्ट दरम्यान जिल्हा अधिवेशने आणि विस्तारित कार्यकारिणी बैठका होणार असून, पक्षाच्या मंडल रचनेतील सर्व ७७८ मंडलांमध्ये ९,१० आणि ११ ऑगस्ट दरम्यान अधिवेशने आणि बैठका होतील अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी बुधवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस विजय़ चौधरी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.
जिल्हा आणि मंडल स्तरावरील अधिवेशनांचे नियोजन आणि तयारी करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेते २५,२६ आणि २७ जुलैत विभागवार प्रवास करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जिल्हा व मंडल स्तरावर मार्गदर्शन
श्री . पाटील म्हणाले, की पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्याच पद्धतीने आता या जिल्हा आणि मंडल स्तरावरील अधिवेशनालाही वरिष्ठ नेते संघटनात्मक ७८ जिल्ह्यांत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. आगामी काळात भाजपाची वाटचाल आणि भूमिका या विषयांवर विस्तृत चर्चा या अधिवेशनांमधून करत भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जाईल.
नेत्यांचा विभागवार संवाद
भारतीय जनता पार्टीने यासाठी विभागवार नियोजन केले असून, ठाणे – कोकण येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उत्तर महाराष्ट्रात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ,पश्चिम महाराष्ट्रात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि खा. धनंजय महाडिक, मराठवाड्यात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे ,पूर्व व पश्चिम विदर्भात वन मंत्री सुधीर मुनगंटीवार व आ.संजय कुटे आणि मुंबईमध्ये आ.आशिष शेलार हे पक्षाचे वरिष्ठ नेते प्रवास करून तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.