इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सत्तेत राहून सट्टेबाजीचा मोठा खेळ खेळत त्यातून कमावलेला पैसा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वापरला आहे, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.यावेळी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. सट्टेबाजी ॲपचे प्रवर्तक हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांना नियमित पैसे देत असल्याची धक्कादायक माहिती काल ईडीच्या तपासात उघड झाली. या घोटाळ्याला कॉंग्रेसच्या बघेल सरकारचा पाठिंबा आहे असे भाजपा पहिल्यापासून सांगत होती, आता हे बिंग फुटले असून बघेल याना एकूण ५०८ कोटी रुपये देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचेही आ. दरेकर यांनी नमूद केले.
आ. दरेकर म्हणाले की, विकासाच्या बाता करणा-या कॉंग्रेसच्या बघेल सरकारचा विकासाचा बुरखा टराटरा फाटला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महादेव ॲपच्या प्रवर्तकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम छत्तीसगडमध्ये पोहचवली जात असल्याची गुप्त माहिती अंमलबजावणी संचालनालयाला ( ईडी ) मिळाली होती. या माहितीच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल ट्रायटन आणि अन्य ठिकाणी झडती घेतली. तसेच काँग्रेस पक्षाच्या निवडणूक खर्चासाठी मोठी रक्कम पोहोचवण्यासाठी संयुक्त अरब अमीरातीतून पाठवलेला कॅश कुरिअर असीम दास याला अटक करून त्याच्या घरातून ५.३९ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. ही रक्कम छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री बघेल यांना द्यायची होती असे दासने मान्य केल्याचेही ‘ईडी’ने म्हटले आहे. यावरून सट्टेबाजी हा काँग्रेसच्या बघेल सरकारचा साईड बिझनेस असून बघेल यांनी छत्तीसगडच्या विकासाला बेटींगवर पणाला लावले अशी टीकाही आ. दरेकर यांनी केली.
‘ईडी’ने महादेव ॲपच्या काही बेनामी बँक खात्यांतून १५.५९ कोटी रुपयांची शिल्लक रक्कम गोठवली आहे. यापूर्वीच ४ आरोपींना अटक केली आहे आणि ४५० कोटींहून अधिक रुपयांची गुन्हेगारी रक्कम जप्त केली आहे. याप्रकरणी १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या सट्टेबाजी सिंडिकेटचे प्रवर्तक परदेशात बसून मित्र व सहकारी यांच्या मदतीने भारतभर हजारो पॅनल चालवत आहेत आणि त्यांनी त्यातून हजारो कोटी रुपये कमावले आहेत, असेही आ . दरेकर यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्री. बघेल आणि काँग्रेस पक्षाला आ. दरेकर यांनी काही प्रश्न विचारले आहेत.
- असीम दास शुभम सोनीच्या माध्यमातून छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्यांना पैसे पाठवत असे, हे खरे आहे का?
- असीम दास ला रायपूरला जाऊन भूपेश बघेल यांना निवडणूक खर्चासाठी पैसे देण्याचे आदेश देण्यात आले होते, हे खरे आहे का?
- २ नोव्हेंबर रोजी हॉटेल ट्रायटनमध्ये असीम दास कडून पैसे जप्त करण्यात आले, हे खरे आहे का?
- आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट – PMLA ) अंतर्गत वेगवेगळ्या बँक खात्यांमधील १५ कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत, हे खरे आहे का?
- असीम दास नावाच्या व्यक्तीकडून ५.३० कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे, हे खरे आहे का?