इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकरमुळे तिला दिव्यांगाचा बोगस दाखला देणारे डॉक्टर अडचणीत आले आहेत. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या पत्रानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पिंपरी पालिकेला चौकशीचे आदेश दिले आहेत. अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांसह मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आदेश पिंपरी पालिकेला देण्यात आले आहेत.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सगळ्यांचे धाबे दणाणले आहे.‘वायसीएम’ रुग्णालयाने पूजाला दिलेल्या अपंगत्वाचं प्रमाणपत्रात पूजा डाव्या गुडघ्यात कायमस्वरूपी सात टक्के अधू असल्याचे म्हटले आहे. याच प्रमाणपत्राच्या आधारे पूजाने केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवल्याने या चौकशीला अधिक महत्त्व आले आहे.